21 फेब्रुवारी रोजी होणार आयोजन : 60 हून अधिक युद्धनौका होणार सामील
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शत्रूला सामोरे जाणे आणि देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी भारतीय नौदल किती सज्ज आहे याची समीक्षा राष्ट्रपती करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 21 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम येथे जात भारतीय नौदलाच्या फ्लीटची समीक्षा करतील. यादरम्यान सर्वात मोठी स्वदेशी विनाशिका ‘विशाखापट्टणम’ देखील दिसून येईल तर पी-8आय विमान देखील फ्लाय पास्टमध्ये सामील होणार आहे.
प्रत्येक राष्ट्रपतीच्या कार्यकाळात एकदा भारतीय नौदलाचा फ्लीट रिह्यू होतो. यात सर्वोच्च कमांडर राष्ट्रपतींना भारतीय नौदलाची क्षमता आणि नौदलाच्या युद्धनौका देशाच्या सागरी सीमेच्या रक्षणासाठी कितपत तयार आहेत हे दाखविण्यात येते. यंदाच्या फ्लीट रिव्हय़ूमध्ये सामील होणाऱया युद्धनौका या प्रामुख्याने स्वदेशी आहेत. याच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकल्या जाणाऱया पावलांची झलक दिसून येणार आहे.
यंदाच्या फ्लीट रिह्यूमध्ये 60 हून अधिक नौका भाग घेणार आहेत. यात तटरक्षक दलाच्या नौका, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची नौका देखील असेल. 45 हून अधिक नौका स्वदेशी असतील. प्रेसिडेंट यॉर्ड म्हणजेच ज्या नौकेत बसून राष्ट्रपती समीक्षा करतील, ती देखील स्वदेशी राहणार आहे.
फ्लीटमध्ये भारतीय नौदलाच्या प्रत्येक शेणीचे नौका असणार आहे. अलिकडेच भारतीय नौदलात सामील झालेली सर्वात मोठी विनाशिका विशाखापट्टणम देखील याचा हिस्सा असणार आहे. ही विनाशिका माझगाव डॉकयार्डनेच तयार केली आहे. विशाखापट्टणम गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. शत्रूच्या रडारला चकवा देत ही विनाशिका मोहीम फत्ते करू शकते.
प्रजासत्ताक दिन संचलनात राष्ट्रपती एका ठिकाणी उभे राहून मानवंदना स्वीकारतात, तर फ्लीट रिह्यूमध्ये सर्व युद्धनौका एका फॉर्मेशनमध्ये अँकर्ड म्हण्जेच स्थिर राहतात. राष्ट्रपतींची युद्धनौका त्यांच्या जवळून जाते आणि राष्ट्रपती फ्लीटचा आढावा घेतात. यंदाच्या फ्लीट रिह्यूची थीम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी निगडित आहे.
60 हून अधिक नौकांसह 50 पेक्षा अधिक विमाने असणार असून ती रिह्यूदरम्यान फ्लाय पास्ट करणार आहेत. यात चेतकपासून एएलएच, कामोव्ह, सी किंग, डॉनियर, मिग-29 के पासून पी-8आय यांचा समावेश असेल. पी-8 आय हे टेहळणी विमान असून ते खोल समुद्रातील शत्रूच्या पाणबुडीचा थांगपत्ता लावू शकते.









