प्रतिनिधी/ पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे कुणाचा फायदा झाला आणि कुणाचे भले झाले हे चार वर्षांनंतरही अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी नुकसान मात्र देशभराचे झाले, आणि जास्त करून गरीब, अशिक्षित जनतेचेच जास्त झाले, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
2016 मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली होती. तो दिवस काँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस म्हणून देशभरात पाळला जातो. त्यासंबंधी गोमंतकीय जनतेला माहिती देण्यासाठी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत कामत बोलत होते. सोबत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष ज्यो डायस, आदी, पदाधिकारी उपस्थित होते.
8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदी जाहीर केली. त्यावेळी बोलतांना त्यांनी काळा पैसा संपेल, कर चोरी बंद होईल, बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रकार बंद होतील तसेच अतिरेक्यांना होणारा अर्थपुरवठा बंद होईल, यासारखी अनेक कारणे देत आपल्या निर्णयाचे प्रचंड समर्थन केले. परंतु प्रत्यक्षात ते किती यशस्वी ठरले हा संशोधनाचा विषय ठरेल. कारण आज आपण पाहतो त्याप्रमाणे नोटाबंदी मुळे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झाल्याचे दिसून येत आहे. या निर्णयामुळे बेकारी प्रचंड वाढली, मोठमोठे उद्योगधंदे बंद पडले, बांधकामक्षेत्र तर पूर्ण कोलमडले, त्याशिवाय हजारो लोकांची कष्टाची कमाई मातीमोल ठरली, गरीब गरजवंत लोकांवर बिकट परिस्थिती ओढवली, एवढेच नव्हे तर नोटा बदलून घेण्यासाठी कित्येक दिवस हेलपाटे मारताना उपाशीपोटी उन्हात रांगेत राहिल्या ठिकाणी शेकडो लोकांनी प्राणही गमावले, असे कामत यांनी सांगितले.
अशावेळी पंतप्रधान जे जे दावे करत होते ते सर्व फोल ठरले आहेत. डिजीटायझेशनचा तर पार फज्जाच उडाला, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली. नोटाबंदीनंतरच्या काळात हा एक मोठा व्यवसाय उदयास आला तो म्हणजे जुन्या नोटा बदलून देण्याचा. या व्यवसायात अनेकांनी प्रचंड कमाई केली. अन्यथा अन्य कुणाचा फायदा झाल्याचे पाहणीत आले नाही, असे कामत म्हणाले. या सर्व काळ्या आठवणींना उजाळा म्हणुनच हा विश्वासघात दिवस देशभरात पाळला जातो, असेही त्यांनी पुढे सांगितले.
गिरीश चोडणकर यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. रामदेव बाबा यांनी प्रथम नोटाबंदीचे जोरदार समर्थन केले. नंतर त्यांच्यावर पश्चाताप करण्याची पाळी आली. यावरून तो निर्णय पूर्ण चुकीचा होता, हे स्पष्ट होते असे चोडणकर म्हणाले.
नोटाबंदीमुळे बेरोजगारी प्रचंड वाढली. वार्षिक 2 कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱया पंतप्रधानांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे एका झटक्यात सुमारे 2 कोटी लोकांना रोजगार गमवावे लागले. उद्योगधंदे बंद पडले. गोव्यातही याचा परिणाम गंभीरतेने दिसून आला, अशी टीका वरद म्हार्दोळकर यांनी केली.









