वृत्तसंस्था / काठमांडू :
नेपाळमधील राजकीय संघर्ष संपण्याची कुठलीच चिन्हे नाहीत. पंतप्रधान केपी शर्मा ओली नेपाळ कम्युनिस्ट पक्षात एकाकी पडले असले तरीही राजीनामा देण्यास तयार नाहीत. तर त्यांचे मुख्य विरोधक पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान 6 वेळा चर्चा झाली असली तरीही वादावर तोडगा निघू शकलेला नाही.
सत्तास्थान संकटात असल्याने ओली यांनी पुन्हा नवी राजकीय खेळी केली आहे. त्यांनी स्वतःच्या समर्थकांना रस्त्यांवर उतरून प्रचंड यांच्या विरोधात निदर्शने करण्यास सांगितले आहे. परंतु कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीचा पाठिंबा गमावलेले ओली त्याच्या बैठकीपासून पळ काढत आहेत.
ओली आणि प्रचंड यांच्यात सलग 6 व्या दिवशी चर्चा झाली आहे. बैठकीनंतरही ओली आणि प्रचंड यांच्यात तडजोड झाली नसल्याचे सांगण्यात आले. ओली सत्ता सोडण्यास तयार नाहीत तर प्रचंड त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. या राजकीय संघर्षाचा प्रभाव सरकारच्या कामकाजावर पडत आहे.
ओली यांच्यावर गंभीर आरोप
नेपाळमधील कोरोना संसर्गावर पंतप्रधान ओली यांना नियंत्रण मिळविता आलेले नाही. तर विदेशातून परतलेल्या नागरिकांसाठी सरकारने कुठलीच व्यवस्था केलेली नाही. भारतावर आरोप करून ओली यांनी चीन समर्थक असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. तसेच पद राखण्यासाठी ओली खोटी विधाने करत असल्याचा आरोप पक्षांतर्गत विरोधकांनी केला आहे.









