रॉ प्रमुखांच्या भेटीची पार्श्वभूमी : जुना नकाशा केला ट्विट
वृत्तसंस्था / काठमांडू
चीनच्या इशाऱयावर आगळीक करु पाहणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉच्या प्रमुखांची भेट घेतल्यावर सूर बदलताना दिसून येत आहेत. नेपाळच्या पंतप्रधानांनी विजयादशमीनिमित्त शुभेच्छा देणारा ट्विट केला असून यात नेपाळचा जुना नकाशा वापरण्यात आला आहे. नेपाळ आणि भारत यांच्यातील वादाचे मूळ त्याचा नवा नकाशा असून यात भारतीय भूभागांवर दावा करण्यात आला आहे.
कथित सीमा वादावर कठोर भूमिका घेणाऱया पंतप्रधान ओली यांच्या भूमिकेत रॉ प्रमुख सामंत कुमार गोयल यांच्या भेटीनंतर बदल झाल्याचे मानले जात आहे. तत्पूर्वी गोयल यांनी बुधवारी रात्री ओली यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली होती. याचबरोबर भारतीय सैन्यप्रमुख जनरल नरवणे हे देखील पुढील महिन्यात नेपाळच्या दौऱयावर जाणार आहेत.
नेपाळमध्ये वादात
याचदरम्यान रॉ प्रमुखांची भेट घेऊन ओली मायदेशात वादात सापडले आहेत. या भेटीवरून त्यांचा स्वतःचा नेपाळ कम्युनिस्ट पक्षच त्यांच्या विरोधात उभा ठाकला आहे. सत्तारुढ पक्षाच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर कूटनीतिक नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते भीम रावल यांनी रॉ प्रमुख आणि ओली यांच्या भेटीमुळे नेपाळच्या हितांची पूर्तता झाली नसल्याचा दावा केला आहे. ही बैठक विदेश मंत्रालयाच्या सल्ल्याशिवाय अपारदर्शक पद्धतीने झाल्याने आमची राजकीय प्रणाली कमकुवत होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
औपचारिक भेट
रॉ प्रमुख गोयल यांनी गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान ओली यांची भेट घेतल्याची पुष्टी माध्यम सल्लागार सूर्य थापा यांनी दिली आहे. थापा यांनी या बैठकीचा तपशील देण्यास मात्र नकार दिला आहे. या बैठकीदरम्यान अन्य प्रतिनिधी उपस्थित नव्हता, असे नेपाळच्या विदेश मंत्रालयाचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.









