ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळ भारतीय सीमेलगत नवीन 89 बॉर्डर आउटपोस्ट उभारत आहे. या आउटपोस्टवर दहा हजार सशस्त्र सैन्य तैनात करण्याची नेपाळची योजना आहे. नेपाळ गृह मंत्रालयाकडून याबीबातची माहिती देण्यात आली आहे.
उत्तराखंडच्या कुमाऊं प्रांताच्या जवळील सीमा कंचनपूर जिल्ह्यांमध्ये आठ, डडेलधुरामध्ये तीन, कैलालीमध्ये एक आणि बैतडीमध्ये एक बॉर्डर आउटपोस्ट उभारण्यात येत आहेत. तर चीनच्या उत्तर सीमेवर तपलजंग आणि ओलांगचुंग येथे प्रत्येकी एक आउटपोस्ट उभारले जाणार आहे. तसेच हिल्सा, मुस्तांग, मनाङ आणि दार्चुला या भागात काही आउटपोस्ट उभारण्यात येणार आहे.
नेपाळने मिशन तराई नंतर पश्चिमांचल अभियानाला सुरुवात केली आहे. विकासापासून खंडित झालेल्या दुर्गम सीमा भागांना जोडण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. भारतीय सीमेवर प्रत्येकी 3.5 कि.मी. अंतरावर आउटपोस्ट उभारण्याची नेपाळची योजना आहे.
यापूर्वी नेपाळने भारतीय हद्दीतील लिम्पिआधुरा, लिपुलेख आणि कालापानी या भागावर हक्क दाखवून नवीन नकाशात त्याचा समावेश केला आहे. त्यामुळे नेपाळचा भारतासोबत नवा वाद निर्माण झाला आहे.









