पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी चिनी राजदूताला दूर लोटले
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी देशांतर्गत राजकारणात चीनच्या हस्तक्षेपाला धुडकावून लावण्यास सुरुवात केली आहे. अन्य कुठल्याही देशाच्या मदतीशिवाय स्वतःच्या पक्षातील आव्हानांना हाताळू शकतो असे ओली यांनी चिनी राजदूत हाओ यांकी यांना सुनावले आहे.
जून-जुलैत पंतप्रधान ओली यांची सत्ता संकटात असताना चिनी राजदूताने पुष्पकुमार दहल प्रचंड यांची मनधरणी करण्यासाठी पूर्ण जोर लावला होता. चिनी राजदूतांच्या हस्तक्षेपामुळे ओली यांना सत्ता वाचविण्यासाठी काही वेळ मिळाला असला तरीही सद्यकाळात पक्षात फूट निश्चित मानली जात आहे.
पंतप्रधान ओली यांची प्रतिमा मागील दोन वर्षांमध्ये भारतविरोधी राहिली आहे. देशाचा वादग्रस्त नकाशा ओली यांनी संसदेत संमत करवून घेतल्यावर भारतासोबत नेपाळचे संबंध अत्यंत नाजुक टप्प्यातून जात आहेत. तर काही दिवसांपूर्वीच भारतीय विदेश सचिव, सैन्यप्रमुख आणि गुप्तचर यंत्रण रॉचे प्रमुख यांनीही नेपाळचा दौरा केला आहे.
यांकी यांचे राजकारणात स्थान
चिनी राजनयिकांच्या नव्या पिढीशी संबंधित ‘वोल्फ वॉरियर’ हाओ यांची नेपाळच्या सत्तावर्तुळात चांगलीच उठबस आहे. कुठल्याही प्रकारे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाला ओली यांच्या बाजूने उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. ओली सरकारने चिनी राजदूतांच्या सूचनेनुसार अमेरिकेकडून मिळणारी 50 कोटी डॉलर्सची मदतही नाकारून याची परतफेडही केली होती.









