प्रतिनिधी / अकलूज
आमदारकीची शपथ घेऊन अकलूजला परतलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. रेड व ऑरेंज झोन मधून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करा असा अध्यादेश सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार मोहिते -पाटील होम क्वारंटाईन झाले आहेत.
विधान परिषदेवर बिनविरोध गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा सोमवारी मुंबईत आमदारकीचा शपथविधी संपन्न झाला. शपथविधी उरकून आमदार मोहिते पाटील रात्री आपल्या गावी अकलूज येथे परतले. त्यानंतर मंगळवारी आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील याही मुंबईला गेल्या होत्या त्यामुळे त्यांनीही यावेळी तपासणी करून घेतली. त्याशिवाय आमदार मोहिते-पाटील यांचे स्वीय सहाय्यक बापू शितोळे, गाडी चालक किसन कदम व मधुकर घोगरे हे ही शपथविधीच्या कार्यक्रमास मुंबई येथे गेले होते. या सर्वांनीही आपली तपासणी करून तेही होम क्वारंटाईन झाले आहेत.
रेड व ऑरेंज झोनमधुन प्रवास व वास्तव्य करून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना कॉरंटाईन करावे असा अध्यादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढला आहे. त्या आदेशाचे तंतोतंत पालन करत आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील सपत्निक होम कॉरंटाईन झाले आहेत.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाय योजना यासंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी अनेक महत्वपूर्ण बाबी राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर कळवून त्यावर उपाययोजना सुचवण्याचे महत्वपूर्ण कार्य वेळोवेळी केले आहे. कोरोनाचा संसर्ग सोलापूरच्या ग्रामीण भागात होऊ नये यासंदर्भातही त्यांनी विशेष लक्ष घालून प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ठेवली आहे. आज आमदार झाले असले तरी शासकीय नियमांना कुठेही छेद जाऊ नये ह्या हेतूने ते १४ दिवसांसाठी होम कॉरंटाईन झाले आहेत