जकार्ता शहराचा दर्जा काढून घेतला : नुसंताराचा सनातन हिंदू धर्माशी संबंध
वृत्तसंस्था / जकार्ता
इंडोनेशियाची राजधानी आता जकार्ता शहर नसणार आहे. जकार्ता अत्यंत घनदाट लोकसंख्येचे शहर झाल्याने तेथे मूलभूत सुविधांवर गरजेपेक्षा अधिक भार पडत आहे. याचमुळे सरकारने देशाची राजधानी तेथून हटवत ‘नुसंतारा’ येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या या देशाची नवी राजधानी ‘नुसंतारा’चे सनातन हिंदू धर्माशी कित्येक शतके जुना संबंध आहे.
स्थानिक जैवनीज भाषेत नुसंताराचा अर्थ बेटसमूह असा होतो. या बेटसमुहाने 14 व्या शतकात जावा बेटावर राज्य करणाऱया मजापहित साम्राज्याच्या काळात आकार घेतला होता. त्यावेळी या साम्राज्याचे हयम वुरुक हे हिंदू राजे होते आणि त्यांच्या पंतप्रधानांचे नाव गजःमद होते. पूर्ण नुसंताराला मजापहित साम्राज्यात सामील करेपर्यंत किंवा त्याची नव्याने स्थापना करत नाही तोवर भोजन करणार नसल्याची प्रतिज्ञा गजःमद यांनी केली होती. त्यांनी गजःमद यांनी मोहिमेवर जात सध्याच्या मलेशिया, सिंगापूर, ब्रुनेई, दक्षिण थायलंड, तिमोर लेस्ते आणि दक्षिण-पश्चिम फिलिपाईन्सचे भाग जिंकले होते. या सर्व भागांना मिळून ‘नुसंतारा’ची पुनर्रचना करण्यात आली होती.
याच कामगिरीमुळे गजःमद यांना इंडोनेशियात राष्ट्रीय नायकाचा दर्जा प्राप्त आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रीय प्रतीक गरुड असून त्याला हिंदू परंपरेत भगवान विष्णू यांचे वाहन म्हटले जाते. या देशात केवळ 40 हजारांच्या आसपास हिंदू लोकसंख्या आहे. परंतु भगवान राम आणि रामायण शतकांपासून इंडोनेशियन मुस्लिमांची जीवनशैली आणि संस्कृतीचा अतूट हिस्सा ठरलेले आहेत.
नवी राजधानी न्योमैन स्थापन करणार
नवी राजधानी ‘नुसंतारा’ पूर्व कलिमंथन प्रांताच्या 216 चौरस मैल इतक्या क्षेत्रात निर्माण होणार आहे. तेथे राष्ट्रपती भवनाचा परिसर डिझाइन करण्याची जबाबदारी बेलिनीज शिल्पकार न्योमैन नुआर्ता यांना देण्यात आली आहे. न्योमैन यांनी यापूर्वी गरुड-विष्णू कंचन प्रतिमेचे डिझाइन केले होते.









