प्रतिनिधी / वडूज
खटाव तालुक्यामध्ये वाळू उपसा तसेच गौण खनिज उत्खनन मुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने नूतन तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देत आज गौण खनिज उत्खनन करणारी वाहने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी औंध नजीक असणारी कारंडवडी येथे सुनील मुगुटराव करंडे व इतर दोन यांच्या गट 16/2 मधून मुरूम उत्खनन करत असल्याचे निदर्शनास आले. या हद्दीतील गट 23/15 मध्ये कल्याणसिंह राजपूत यांच्या हद्दीत हे मुरूम टाकण्याचे काम सुरू होते. जेसीबी क्रमांक एमएच11 सी डब्लू 2748 क्रमांकाच्या या जेसीबी व एम एच11 सी ए 9014 ट्रक्टर या दोन वाहनातून मुरूम उत्खनन व वाहतूक होत होती. ङ्ग या वाहनांचे मालक सिद्धेश जगन्नाथ येवले व वैभव भाऊसाहेब घाडगे ( दोघे रा कळंबी) व सहभागी व्यक्ती विजय सुखदेव कारंडे ( रा. कारंडेवडी) यांची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान सदरची दोन्ही वाहने जप्त करून औंध पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. सदरची कारवाई औंधचे मंडलधिकारी गजानन कुलकर्णी, तलाठी निनाद जाधव यांनी केली. एकूण चाळीस ब्रास मुरूम उत्खनन केले असल्याची माहिती खटावचे नूतन तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली . पदभार स्वीकारल्यानंतर किरण जमदाडे यांनी संपूर्ण खटाव तालुक्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
आज झालेली कारवाईची माहिती तालुक्यात समजताच वाळू माफिया तसेच अवैध गौण खनिज उत्खनन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. दसर्याला आपटय़ाची पाने ( सोने ) लुटण्याऐवजी वाळू आणि अवैध गौण खनिज उत्खनन लूटणार्यासाठी तहसीलदार किरण जमदाडे हे आता कर्दनकाळ ठरले. पंधरा दिवस खटाव तालुक्याला तहसीलदार पदाची प्रतीक्षा होती. किरण जमदाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा दिला. त्यानंतर त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. तरुण तडपदार अधिकारी मिळाल्याने खटावकरांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच मुसांडवाडी येथे अवैध मुरूम वाहतूक करणारा डंपर ही आज महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे .









