प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात यंदा महापुराने प्रचंड नुकसान झाले. पंचनामे झाले आणि हेक्टरी 40 हजार रुपये नुकसान भरपाईचा निर्णय जाहीर झाला. पण प्रत्यक्षात प्रति गुंठ्याला 135 रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांवर फार मोठा अन्याय करणारा आहे. हा आदेश मागे घेऊन हेक्टरी 40 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱयांना दिले आहे. नवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्वीकारले.
सध्या महाराष्ट्र शासनाने ई पाहणी करण्याचे योजिले आहे. याबाबत शेतकऱयांना अँड्रॉइड मोबाईल नसल्याने कुचंबणा होत आहे. तेव्हा याबाबत पूर्वीप्रमाणे तलाठी यांचे मार्फत पीक पाहणी करून घेण्यात यावी. ई पीक पाहणी करण्याचे नक्की झाले असल्यास ते सुद्धा तलाठी यांचे कार्यालयातूनच करण्यात यावे. अशी मागणीही निवेदनात केली आहे. साखर हंगाम सुरू होत आहे. त्या अगोदरच निती आयोग, राज्य सरकार व कृषिमूल्य आयोग एफ.आर.पी. चे तीन तुकडे पाडण्याचे ठरवत आहेत. उसाच्या रिकव्हरी वर दर देण्याच्या क्रमामध्ये दीड टक्के रिकव्हरी चोरी केली आहे. एफआर.पी.प्रमाणे दर देण्यासाठी पूर्वी आठ टक्के रिकव्हरी हा पाया होता. आता हाच पाया दहा टक्के रिकव्हरी वर केला आहे.
शिवाय 2021 / 22 या हंगामासाठी दहा टक्के रिकव्हरीवर 2900 रुपये प्रतिटन जाहीर झाला आहे. त्याउलट उत्तरेकडच्या राज्यात 3150 रुपये 10 टक्के रिकव्हरी वर जाहीर झाला आहे. या मधून तोडणी वाहतूक वजा करता शेतकऱयांच्या हातात काही पडत नाही. म्हणून प्रति टनी तोडणी वाहतूक वजा जाता स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी प्रमाणे प्रतिटन 3500 रुपये दर जाहीर करावा. कारण प्रति टन उत्पादन खर्च 2400 रुपये येतो.अधिक 50 टक्के नफा धरून दर काढल्यास शेतकऱयांवरील अन्याय दूर होईल. त्याच प्रमाणे तोडणी कामगार, गरीब कष्टकरी शेतकऱयांवर बेकायदेशीररित्या प्रतिटन शंभर कधी दोनशे रुपये वरकमाई शेतकयांकडून घेतात. त्यावर कारखाना व शासनाच्या वतीने प्रतिबंध घालून शेतकऱयांची लूट थांबवावी. अशी मागणी निवेदना केली आहे.
महाराष्ट्र राज्य किसान सभा सरचिटणीस नामदेव गावडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, किसान सभा जिल्हा सेक्रेटरी नामदेव पाटील, किसान सभा जिल्हा अध्यक्ष वाय. एन. पाटील, एन.सी.पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी रघुनाथ कांबळे उपस्थित होते.









