कोरिर, पिचार्डो, गुडाफ त्सेगे, रिलेमध्ये अमेरिका, कॅनडा यांना सुवर्णपदके
वृत्तसंस्था/ युजीन, अमेरिका
भारताच्या ऑलिम्पिक सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये ऐतिहासिक कामगिरी करीत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. या प्रकाराचे सुवर्ण गेनाडाच्या विद्यमान विजेत्या अँडरसन पीटर्सने पटकावले. अन्य क्रीडा प्रकारांत महिलांच्या रिलेमध्ये अमेरिकेने, पुरुषांच्या 800 मी. मध्ये इमॅन्युएल कोरिरने, पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये पोर्तुगालच्या पेड्रो पिचार्डोने, पुरुषांच्या रिलेमध्ये अमेरिकेला चकित करीत कॅनडाने, महिला रिलेत अमेरिकेने, महिलांच्या 5000 मी.मध्ये इथिओपियाच्या गुडाफ त्सेगेने सुवर्णपदक पटकावले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविल्यामुळे नीरजकडून तशाच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा केली जात होते. मात्र पीटर्सने दोनदा 90 हून अधिक मीटर्सचे अंतर गाठून त्याच्यासमोर तगडे आव्हान उभे करीत आपले सुवर्णही निश्चित केले. नीरजने चौथ्या प्रयत्नात 88.13 मी. भालाफेक केली, जी त्याला रौप्यपदक मिळवून देण्यात पुरेशी ठरली. त्याची ही कारकिर्दीतील चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम भालाफेक होती. झेकच्या वादलेचने (88.09 मी.) कांस्य पटकावले.

महिले रिलेत अमेरिकेची बाजी
महिलांच्या 4ƒ100 मी. रिलेमध्ये अमेरिकन महिलांनी सुवर्णपदक पटकावताना स्टारचा भरणा असलेल्या जमैकाला मागे टाकले. मेलिसा जेफर्सन, ऍबी स्टीनर, जेना प्रान्दिनी, त्वनिशा टेरी यांनी 41.14 सेकंद अवधीत शर्यत पूर्ण करीत पहिले स्थान मिळविले. जमैकाच्या धावपटूंनी 41.18 सेकंद वेळ नोंदवत रौप्य व जर्मनीच्या खेळाडूंनी 42.03 सेकंद अवधी घेत कांस्यपदक मिळविले. जमैकन संघात शेली ऍन पेजर प्राईस, शेरिका जॅक्सन इलेन थॉम्पसन हेराह, केम्बा नेल्सन यांचा समावेश होता.
800 मी.मध्ये कोरिर चॅम्पियन
पुरुषांच्या 800 मी. शर्यतीत केनियाचा ऑलिम्पिक चॅम्पियन इमॅन्युएल कोरिरने सुवर्णपदक मिळविले. या मोसमात त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. पण येथील शर्यतीत त्याने चकमदार प्रदर्शन करीत 1 मि.43.71 से. वेळ नोंदवली. अल्जेरियाच्या दामेल सेदातीने 1ः44.14 मि. अवधी घेत रौप्य, कॅनडाच्या मार्को ऍरोपने (1ः44.28 मि.) कांस्यपदक मिळविले. 2017 व 2019 मधील शर्यतीत कोरिरला उपांत्य फेरीही गाठता आली नव्हती. यावेळी मात्र त्याने थेट सुवर्णपदकालाच गवसणी घातली. त्याच्या यशामुळे केनियाची सुवर्णपदकांची संख्या 7 झाली आहे.
तिहेरी उडीत पिचार्डोची सुवर्णझेप
पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये पोर्तुगालचा ऑलिम्पिक चॅम्पियन पेड्रो पिचार्डोने सुवर्णयश मिळविले. अमेरिकेचा अनेक पदके जिंकलेला ख्रिस्तियन टेलरच्या अनुपस्थितीत पिचार्डोने पहिल्याच प्रयत्नात 17.95 मी. उडी घेतली. बुर्किना फासोच्या ऑलिम्पिक कांस्यविजेत्या हय़ुजेस फॅब्रिस झांगोने 17.55 मी. अंतर नोंदवत रौप्य व चीनच्या यामिंगा झूने 17.31 मी. अंतर नोंदवत कांस्यपदक मिळविले.
पुरुष रिलेत कॅनडाचा अमेरिकला धक्का
पुरुषांच्या 4ƒ100 मी. रिलेमध्ये कॅनडाने अमेरिकेला चकित करून सुवर्णपदक पटकावले. या शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकन खेळाडूकडून बॅटन देताना किंचित विलंब झाल्याने त्यांना सुवर्णपदक स्वतःकडेच राखण्यापासून वंचित व्हावे लागले. कॅनडाने याचा लाभ घेत सुवर्णपदक निश्चित केले तर ब्रिटनच्या धावपटूंनी कांस्यपदक मिळविले. अमेरिकेच्या एलिजाह हॉल व मर्विन ब्रेसी यांना बॅटन बदलताना किंचित वेळ लागला. त्याचा लाभ घेत कॅनडाच्या आंदे डी ग्रासेने शेवटच्या टप्प्यात ब्रेसीला मागे टाकत कॅनडाचे पहिले स्थान निश्चित केले. 1997 नंतर कॅनडाला या प्रकारात मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. अमेरिककडे अनेक प्रतिभावान धावपटू आहेत. मात्र 2001 पासून त्यांना फक्त तीनदा वर्ल्ड टायटल जिंकता आले आहे आणि ऑलिम्पिकमध्येही त्यांना सिडनीनंतर सुवर्णपदक जिंकता आलेले नाही.
गुडाफ त्सेगेला सुवर्ण
महिलांच्या 5000 मी. शर्यतीत इथिओपियाच्या गुडाफ त्सेगेने सुवर्णपदकाचा मान मिळविला. विश्वविक्रमधारक तिचीच सहकारी लेतेसेनबेट गिडे अखेरच्या टप्प्यात मंदावल्याने गुडाफने मुसंडी मारत आघाडी घेत पहिले स्थान मिळविले. नेदरलँड्सच्या सिफान हसनने गुडाफला जोरदार लढत दिली. पण तिला यश आले नाही. केनियाच्या बियाट्रिस छेबेतने रौप्य व इथिओपियाच्या दावित सेयॉमने कांस्य मिळविले. गुडाफने याआधी 1500 मी. मध्ये रौप्य मिळविले आहे. इथिओपियाने एकूण दहा पदकांसह दुसरे स्थान मिळविले असून अमेरिकेने पदकतक्त्यात पहिले स्थान मिळविले आहे.
तिहेरी उडीत भारताच्या एल्डहोस पॉलला नववे स्थान
पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये भारताच्या एल्डहोस पॉलने नववे स्थान मिळविले तर 4ƒ100 मी. भारताच्या रिले संघाला 12 वे स्थान मिळाले. 25 वर्षीय पॉलने तीन प्रयत्नांत 16.79 मी.ची सर्वोत्तम उडी घेतल्याने त्याला अव्वल आठमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्याने 16.37, 16.79, 13.86 असे अंतर नोंदवले. तिहेरी उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय ऍथलीट होता. पात्रता फेरीत त्याने 16.68 मी. अंतर नोंदवत 12 वे स्थान मिळविले होते.
पुरुषांच्या 4ƒ400 मी. रिलेमध्ये भारतीय चौकडीने हीटमध्ये सहावे व एकंदर 12 वे स्थान मिळविले. मोहम्मद अनास याहिया, मुहम्मद अजमल वरियाथोडी, नागनाथन पंडी, राजेश रमेश यांनी 3ः07.29 मि. वेळ नोंदवली.









