ऑनलाईन टीम / नगर :
अरबी समुद्रात बुधवारी निसर्ग चक्रिवादळाने तांडव केले. या चक्रिवादळामुळे जिल्ह्यातील ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच एका व्यक्तीचा दुर्दैवी बळी, तर चार जण जखमी झाले आहेत. चक्रिवादळाचा तडाखा बसल्याने २३ जनावरे दगावली. कच्च्या आणि पक्क्या घरांचे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.
बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत असलेल्या अरबी समुद्रात निगर्स चक्रिवादळाने तांडव केले. मुंबई, ठाणे मार्गे हे वादळ पुढे मध्यप्रदेशात जाणार असले, तरी नगरजिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, अकोले, कोपरगाव हे भौगोलिक क्षेत्र चक्रिवादळाच्या छायेत होते. बुधवारी अरबी समुद्रात उद्भवलेले हे वादळ पुढे नाशिक जिल्ह्यात झेपावले. वादळामुळे जिल्ह्यातील अवकाशात दिवसभरात सोसाट्याचा वारा वाहत होता. काही ठिकाणी वादळासोबत जोरदार पाऊस पडला. या वादळामुळे अकोले तालुक्यातील लहीत बुद्रुक या गावातील सागर पांडुरंग चौधरी, वय ३२ ही व्यक्ती पावसामुळे, घराची भिंत अंगावर पडून मयत झाली.
जिल्ह्यात या वादळामुळे २३ जनावरे दगावली. अशंतः कच्ची असलेल्या ७३८ घरांचे नुकसान, तर चार पक्क्या व २२ अंशतः पक्क्या असलेल्या घरांचे नुकसान या वादळामुळे झाले. २३ झोपड्यांची वाताहत आलेल्या या वादळाने ६३२.३ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच चार जण जखमी झाले आहे.








