समीर नाईक / पणजी
कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या राज्यात अनेक परप्रांतीय कामगार अडकून पडले असून त्यांच्यासाठी असलेली निवारा केंद्रे ‘हाऊसफुल’ झाल्यामुळे त्यांना उघडय़ावर सध्या आसरा घेण्याची पाळी आली आहे. अनेक परप्रांतीय कामगार, मजुर दैनदिन रोजदारीवर काम करुन पोट भरत होते. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांची परीस्थिती बिकट झाली असून त्यांना कामही नाही, असरा नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
सध्या कांपाल येथील भागात अनेकजण झाडाझुडपांमध्ये आपला संसार थाटताना दिसून आहे. याबाबत त्यांच्याशी विचारपूस केल्यास त्यांनी सांगितले की, आम्ही आसाम, कर्नाटक या भागातून येथे कामासाठी आले होतो परंतु आता लॉकडाऊनमुळे काम मिळणे कठीण बनले आहे. तसेच जे कडधान्य होते, ते आता संपत आले आहे. त्यामुळे जेवणा-खाणाची धांदल झाली आहे. आता उपाशी मरण्याची पाळी आमच्यावर आली असून आम्ही हतबल झालो आहोत.
सरकारने जरी परप्रांतियांसाठी निवारा केंद्र स्थापन केले असले तरी ही निवारा केंद्र हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे जे कामगार व मजूर वर्ग आहेत, त्यांचे काय होणार, असा प्रश्न येथे उद्भवतो. तसेच यातील अनेक जणांकडे ओळखपत्र देखील नाही. त्यामुळे त्यांना निवारा केंद्रात आसरा देण्यात नकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कुठेही राहून दिवस काढू शकतो परंतु सरकारने आमच्या जेवणाची तरी सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी असे परप्रांतीय कामगार व मजूर निवारा केंद्र हाऊसफुल्ल झाल्यामुळे उघडय़ावर पडले आहेत. त्यामुळे सरकारने यासाठी काही पाऊले उचलून त्यांना आसरा द्यावा व त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी. तसेच पावसाळापूर्व मोसम असल्यामुळे कुठल्याही प्रकारची कामे असल्यास त्यांच्याकडून करून घेत त्यांच्या कमाईसाठी साधन उपलब्ध करून द्यावे.









