श्रीकृष्ण परमात्मा सर्वज्ञ आहे. सर्वांच्या अंतरंगातही काय विचार येतात तेही तो जाणतो. तुकाराम महाराजही एका अभंगात म्हणतात- न सांगता तुम्हां कळो येते अंतर । विश्वि विश्वंभर परिहारची नलगे । हे देवा! आमच्या मनात काय चालले आहे हे तुला न सांगताच कळते. आता विश्वात तो विश्वंभर भरून राहिला आहे, यासाठी आणखी वेगळे प्रमाण काय हवे? महामुनी शुकदेवांनीही याठिकाणी श्रीकृष्णाचे असेच वर्णन केले आहे. असा जो सर्वज्ञ श्रीकृष्ण, त्याला आपल्यावर आलेल्या किटाळाची वार्ता समजली. आपल्या माथ्यावर प्रसेनाचा कपटाने खून करून स्यमंतकमणी चोरल्याचा हा खोटा आळ मारला जातो आहे हे त्याला समजले. त्यावेळी या आरोपांचे निराकरण करण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः तातडीने निघाला. भोज, अंधक, माधव, कुकुर, वृष्णि, सात्वत, दाशार्ह असे समस्त यादवांचे नेते ज्या राजा उग्रसेनाच्या राजदरबारात बसले होते त्याठिकाणी श्रीकृष्ण आला.
सर्व यादव ज्ये÷ांना वंदन करून तो म्हणाला-आपण सर्वजण जाणताच की मी सर्व यादवांच्या समक्षच सभास्थानी सत्राजिताला सांगितले की त्याने स्यमंतकमणी राजा उग्रसेन यांजकडे द्यावा. यामुळे समस्त यादवांचे कल्याण व्हावे हाच माझा एकमेव हेतू होता. पण हे एवढेच ऐकून सत्राजिताने माझ्यावर अत्यंत घाणेरडा असा खून व चोरी याचा आरोप केला आहे. तरी आता आपण सर्व यादव गोत्रजांनी माझ्या हिताकरिता माझ्यावरील आरोपांचे क्षालन करण्यासाठी चलावे. त्यावर ते गोत्रज यादव म्हणाले-जी वार्ता कर्णोपकर्णी ऐकली होती तीच आता कृष्ण सांगत आहे. कोणी म्हणाले-शोकाच्या आवेगाबरोबर सत्राजित काहीतरी बरळला असेल त्याचा इतक्मया गांभिर्याने विचार करू नये. प्रत्यक्ष लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे त्या भगवंताला कोणत्या संपत्तीची कमतरता आहे? अरे याच्या कोठारात स्यमंतकमण्यासारख्या अगणित रत्नांच्या राशी भरल्या आहेत. ब्रह्मादि देव याची आज्ञा मानतात. तेथे या यत्किंचित मण्याची काय तमास? हा स्वतःच्या केवळ संकल्पाने क्षणात द्वारका नगरी वसवू शकतो. कशाला उगीचच आपण क्रोधाच्या आहारी जावे? काहीजण मात्र म्हणाले-हे काहीही असले तरी न्यायाच्या पूर्ततेसाठी खरे आणि खोटे, दूध आणि पाणी वेगळे करावेच लागेल.
हें ऐकोनि कमलापति । पहावया प्रसेनपद्धति। तुम्हीं चालावें म्हणे समस्तीं । दुर्यशोनिवृत्ति करावया।उग्रसेन वसुदेवप्रमुख । द्वारके ठेवूनि वृद्ध अशेख । सवें घेऊनि यादवकटक । यदुनायक निघाला । द्वारकानगरिंचे नागरजन । अवधियांसहित श्रीभगवान । प्रसेनपदवी अनुलक्षून । चालिला सर्वज्ञ मनुजवत् । पुढें काढिती कुरंगमार्ग । मागें प्रसेनहयशफलाग । चालिले शोधीत दुर्गम दांत । बहु भूभाग आक्रमिला । हुडकित भरले वनीं दुर्घटा । तंव देखिला प्रसेनअश्वसाटा । अवयव पडिले बारा वाटा। वसना मुकुटा ओळखती । चाप तुणीर खटक खङ्ग । माळा मुद्रिका भूषणें चांग । सेवकीं घेवोनि पुढें लाग। सिंहपदवीचा हरि गिंवसी ।








