प्रतिनिधी/ काणकोण
येणाऱया विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड पक्ष सर्वशक्तिनिशी उतरणार असून भाजपाला गोव्यातून हटवा हा नारा घेऊन हा पक्ष मतदारांसमोर जाणार आहे. काणकोण मतदारसंघात या पक्षाचे काम शिस्तबद्धरीत्या चालू असून आपण स्वतः येथून ही निवडणूक लढविणार असल्याचे गोवा फॉरवर्डचे पदाधिकारी प्रशांत नाईक यांनी काणकोण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी घोषित केले.
भाजप पक्ष हा वापरा आणि फेका या वृत्तीचा असून 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 17 आमदार निवडून येऊन देखील नेतृत्वाच्या शर्यतीमुळे तो पक्ष सत्तेपासून बाजूला पडला. त्याची फळे हा पक्ष आज भोगत आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजप सोडून वेळ पडल्यास अन्य समविचारी पक्षांबरोबर समझोता करेल, असे नाईक यांनी सांगितले. सध्या गोव्यात आम आदमी पक्ष आणि ‘आरजी’चे जे आंदोलन चालू आहे ते वाळवंटातील मृगजळासारखे आहे. आम आदमी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी हा पक्ष सोडला आहे, तर ‘आरजी’ केवळ परदेशात नोकरीनिमित्त वास्तव्य करून असलेल्या गोमंतकीयांच्या भरवशावर आवाज काढत आहे, अशी टीका नाईक यांनी यावेळी बोलताना केली.
सध्याचे काणकोणचे आमदार हे पक्षबदलू म्हणून प्रसिद्ध असून आपल्या मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ते भाजपात गेले आहेत. त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळे आपण आणि काणकोणचे एकेकाळचे त्यांचे अन्य सहकारी त्यांच्यापासून बाजूला गेले, असे ते पुढे म्हणाले. काणकोणच्या शिक्षित बेरोजगार युवकांचा प्रश्न घेऊन आपण आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









