कोरोना नियमावलीचा फज्जा : मनपाकडून दंड वसूल
बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयामध्ये सोमवारी गर्दी ओसंडली. कोरोना नियमावली धाब्यावर बसवून उमेदवार आणि समर्थकांनी गर्दी केल्याने कोरोना नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला कठोर पाऊले उचलावी लागली. विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
महापालिका निवडणुकीसाठी सुभाषनगर येथील मुख्य कार्यालय, विश्वेश्वरय्यानगर, अशोकनगर, कोनवाळ गल्ली, गोवावेस व्यापारी संकुल आदी ठिकाणी अर्ज भरण्यासह निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी गर्दी होण्याच्या शक्मयतेने पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स लावून खबरदारी घेतली आहे. सध्या शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असून बेळगाव जिल्हय़ाचा कोरोनाबाधितांचा दर .80 टक्के आहे. ही आकडेवारी कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य खात्याने प्रयत्न चालविले आहेत.
निवडणूक अर्ज भरणा प्रक्रियेसह मतदान प्रक्रियेवेळी कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील कोरोनाच्या नियमावलीचे पालन होत नसल्याचे आढळून येत आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व ठिकाणी गर्दी झाली होती. उमेदवार, सूचक आणि समर्थकांच्या गर्दीमुळे कोरोना नियमावलीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. कोरोना नियमावलीचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना महापालिका कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱयांनी माईकद्वारे केली.
विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल
सामाजिक अंतर राखा, तोंडाला मास्क लावा, तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि सूचकांनीच कार्यालयात यावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले. तरी देखील मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसूल करण्यात आला.









