कोलकात्यात गांधींच्या पुतळय़ासमोर मुख्यमंत्र्यांचे धरणे आंदोलन
पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष आता वाढतच चालला आहे. प्रक्षोभक विधानाप्रकरणी कारवाई करत निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर प्रचार करण्यापासून 24 तासांसाठी बंदी घातली आहे. याच्या विरोधात ममतांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले आहे. कोलकात्यात गांधींच्या पुतळय़ानजीक त्या एकटय़ाच धरणे आंदालेन करत आहेत. येथे व्हिलचेअरवरून पोहोचून त्यांनी चित्र रेखाटले आहे.
ममतांच्या रायदिघी येथील विधानाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अल्पसंख्याक बंधू आणि भगिनींनी भाजपकडून पैसे घेतलेल्या सैतानाचे म्हणणे ऐकू नका, त्याचे म्हणणे ऐकून मते विभागू नका, ते हिंदू आणि मुस्लिमांना लढविणारी सांप्रदायिक विधाने करतात. ते भाजपचे दूत आहेत. भाजप सत्तेवर आल्यास अल्पसंख्याक मोठय़ा धोक्यात पडू शकतात असे ममतांनी म्हटले होते.
विधान मागे घेण्यास नकार
या विधानाची दखल घेत निवडणूक आयोगाने ममतांना 7-8 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. आयोगाने 10 नोटीस बजावल्या तरीही स्वतःचे विधान मागे घेणार नसल्याचे ममतांनी म्हटले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी आचारसंहितेतील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची भीती आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रतिकूल प्रभाव पडत असल्याचे आयोगाने स्वतःच्या आदेशात म्हटले आहे.