प्रतिनिधी/ मुंबई
अभिनेता सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज रॅकेट असल्याने याप्रकरणावर केंद्रीय अंमली पदार्थ विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. याप्रकरणी जोरदार कारवाईला सुरुवात केली, मात्र त्यानंतर या तपासाचा वेग मंदावला होता. शनिवारी रात्री एनसीबीने बॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांकडे जोरदार कारवाईस सुरुवात केली आहे. या कारवाईत मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. याबाबत बॉलिवुडमधील अनेकांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबईसह राज्यात एनसीबीने जोरदार कारवाई करीत ड्रग्ज पेडलरसह चार तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 6 किलो गांजा, एमडीसह एलएसबी ड्रग्ज आणि तीन एसयुव्ही कार जप्त केल्या आहेत. तर या तपासाची पाळेमुळे बॉलिवुडपर्यंत पोहचल्याचे निदर्शनास येताच, एनसीबीने शनवारी रात्रीपासुन जोरदार कारवाईला सुरुवात केली. याप्रकरणी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी झाल्यानंतर आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते एनसीबीच्या रडावर आहेत. यामध्ये काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त केले आहेत. मुंबईतील विविध भागांमध्ये ही छापेमारी सुरू आहे.
मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरात छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान एनसीबीने निर्माते आणि दिग्दर्शकांची नावे उघड करण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरातून काही प्रमाणात अंमली पदार्थ देखील जप्त केले आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेली छापेमारी अद्यापही सुरू आहे. एनसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत काही ड्रग पेडलर्सना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून काही नावे समोर आली आहेत.








