समस्या गंभीर बनल्याने नागरिकांत तीव्र संताप : ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींचेही साफ दुर्लक्ष ; पाण्यासाठी भटकंती होत असल्याने मोठय़ा प्रमाणात गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त बेकिनकेरे गावात पाणी समस्या गंभीर बनली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी चोहीकडे वणवण फिरावे लागत आहे. गावात पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होताना दिसत आहेत. एकीकडे लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी दुसरीकडे बेकिनकेरे गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. उन्हाळय़ाला सुरुवात झाली की, दरवषी ही परिस्थिती निर्माण होते. कित्येक वर्षांपासून गावाला भेडसावत असलेली पाणी समस्या सोडविण्याकडे ग्राम पंचायत, लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावात पाच-सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी सकाळपासूनच भटकंती करावी लागत आहे. शिवाय वाढत्या उन्हाळय़ामुळे कूपनलिका, विहिरींच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांसमोर उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. गावात दोन कूपनलिका व एका विहिरीद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र या कूपनलिका व विहिरींनी देखील पाण्याची पातळी गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी फिरावे लागत आहे. उन्हाळा आला की, पाणी समस्या गंभीर बनत असून कायमस्वरुपी पाणी समस्या निकालात काढण्यासाठी जलाशयाच्या (धरण) निर्मितीची गरज असल्याची प्रतिक्रिया जाणकार ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत. तसेच गावात नाला, तलाव, जलाशय (धरण), असा कोणताच जलस्त्राsत्र नसल्याने पाणी समस्या गंभीर बनत आहे. अलिकडे पाणी समस्या लक्षात घेवून गावकऱयांनी गल्लोगल्ली स्व-खर्चातून कूपनलिकांची खोदाई केली आहे. मात्र या कूपनलिकांच्या पाणी पातळीतही घट झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात इतकी गंभीर पाणी समस्या असून देखील ग्राम पंचायत व लोकप्रतिनिधी कोणतीच हालचाल करत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त करत
आहेत.
दूषित पाण्याचा वापर
ग्रामस्थ पाण्यासाठी सार्वजनिक विहिरींवर अवलंबून होते. मात्र आता सार्वजनिक विहिरींनीदेखील तळ गाठल्याने तलावातील दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ महिलांवर आली आहे. त्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी समस्या गंभीर बनल्याने मे महिन्यात आणखीनच समस्येला सामोरे जाण्याची चिन्हे दिसून येतात.
पाण्याविना जलशुद्धीकरण
केंद्र बनले शोभेची वस्तू
ग्राम पंचायतच्या शेजारी ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र पाण्याविना हे जलशुद्धीकरण केंद्र शोभेची वस्तू ठरत आहे. त्यामुळे हे केंद्र असून अडचण नसून खोळंबा, असे झाले आहे.
लोकप्रतिनिधींचाही कानाडोळा
शेतीला जोडधंदा म्हणून मोठय़ाप्रमाणात दुभती जनावरे पाळली जातात. शिवाय दूध-व्यवसाय करणाऱया गवळी बांधवांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे जनावरची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र गावात जनावरांसाठी पाण्याची कोणतीच सोय नसल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ही निर्माण झाला आहे. तर काही ग्रामस्थ टँकरने पाणी विकत घेत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पाणी समस्येबाबत कित्येकवेळा ग्राम पंचायत व लोकप्रतिनिधींकडे तक्रार व निवेदने देवून देखील अद्याप त्यांच्याकडून आश्वासनापलिकडे ग्रामस्थांना काही मिळाले नाही. लोकप्रतिनिधी निवडणूक जवळ आली की, केवळ ग्रामस्थांसमोर आश्वासनाचा पाऊस पाडतात. प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांना अनेक सोयी-सुविधांपासून दूर रहावे लागते. लोकप्रतिनिधी आजतागायत आश्वासने देवून ग्रामस्थांच्या डोळय़ात धूळफेक करत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.
निवडणूक आली की गावाला भेट

सध्या गावात सहा दिवसाआड पाणी येत असल्याने उन्हाळय़ाच्या सुरुवातीलाच पाणी समस्या गंभीर बनली आहे. सार्वजनिक कूपनलिका व विहिरींनीदेखील तळ गाठल्याने पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. उन्हाळा आला की दरवषी ही परिस्थिती निर्माण होते. लोकप्रतिनिधी केवळ निवडणूक आली की गावाला भेट देवून आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात पाणी समस्या दूर करण्यासाठी कोणतेच उपाय होत नाहीत.
-मल्लाप्पा सावंत (ग्रामस्थ)
दूषित तलावात कपडे धुण्याची वेळ

गावात पिण्याच्या पाण्याबरोबर भांडी व कपडे धुण्यासाठी देखील पाणी मिळत नसल्याने दूषित तलावात कपडे धुण्याची वेळ आली आहे. सकाळी उठल्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरू होते. ग्राम पंचायत व लोकप्रतिनिधींकडून पाण्यासाठी कोणतीच हालचाल दिसत नाही. गावचा पाणी प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी गावात जलाशयाची (धरणाची) गरज आहे.
-मल्लव्वा यळ्ळूरकर (ग्रामस्थ)
पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न

गावची पाणी समस्या कित्येक वर्षांपासून आहे. यापूर्वीच्या ग्रा. पं. सदस्यांनी व लोकप्रतिनिधींनी पाणी समस्येबाबत जेवढे पाहिजे होते, तेवढे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत लोकप्रतिनिधींची चर्चा करून लवकरच गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
-जोतिबा धायगोंडे (ग्रा. पं. सदस्य)









