शेवटचा उपायही अयशस्वी, शुक्रवारी फाशी निश्चित ?
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात संतापाची लाट निर्माण केलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगार मुकेश सिंग याने मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात दिल्लीतील न्यायालयात सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगारांची जीव वाचविण्याची अखेरची धडपडही आता संपल्यात जमा आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच 20 मार्चला चारही गुन्हेगारांना फासावर लटकविण्यात येणार असून तिहार कारागृहात फाशीच्या शिक्षेची तयारी करण्यात येत आहे.
मंगळवारच्या सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी मुकेश याच्या वकीलांवर कठोर ताशेरे झाडले. आपल्या पक्षकाराला सुटका मिळावी म्हणून कायद्याची आणि प्रक्रियेची अशाप्रकारे चिरफाड करणे आणि अवांछनीय मार्गांचा उपयोग करणे योग्य नव्हे, अशी टिप्पणी न्यायाधीशांनी केली. ज्या प्रकारे आपल्या पक्षकारांना वाचविण्याचा प्रयत्न वकीलांकडून केला जात आहे, ते न्यायसंमत नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या पक्षकाराचा शेवटच्या क्षणापर्यंत आणि सर्व कायदेशीर मार्गांचा उपयोग करून बचाव करणे हे प्रत्येक वकीलाचे कायदेशीर कर्तव्य आहे, हे न्यायालयाला मान्य आहे. ते कायद्याचे तत्वच आहे. तथापि, एवढय़ा थराला जाऊन वकीलांनी त्यांचे हे स्वातंत्र्य उपयोगात आणावे, हे अयोग्य आहे. जो अर्ज सादर करण्यात आलेला आहे, त्यात अनेक असत्य बाबी सांगण्यात आल्या आहेत. कोणताही पुरावा सादर करण्यात आलेला नाही. यातून केवळ न्यायालयाचा कालापव्यय होत आहे. वकीलांनी असे प्रकार टाळले पाहिजेत, असे खरमरीत मतप्रदर्शन त्यांनी केले. त्यानंतर गुन्हेगाराचा अर्ज फेटाळण्यात आला.
फाशीसाठी तयारी
येत्या शुक्रवारी चारही आरोपींना तिहार कारागृहात फासावर चढविले जाणार आहे. यासाठीची तयारी करण्यात येत आहे. गुन्हेगारांविरोधात काढण्यात आलेल्या मृत्यू आदेशात देण्यात आलेल्या दिशानिर्देशांप्रमाणे कारागृह प्रशासन सर्व तयारी करत आहे. सर्व गुन्हेगारांना एकाच वेळी फासावर लटकविण्यात येणार आहे.









