देवगडातील घटनेने खळबळ : सव्वा लाखाचे दागिने लंपास : दोन संशयित गजाआड
अश्लिल फोटोवरून धमकावले
वाहनातून नेले निर्जनस्थळी
संशयितांकडून पीडितेचा विनयभंग
प्रतिनिधी / देवगड:
देवगड तालुक्यातील विवाहितेला अश्लिल फोटोवरून धमकावून एका वाहनातून निर्जन स्थळी नेत चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील सुमारे सव्वा लाखाचे दागिने लुटण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच तिचा विनयभंगही करण्यात आला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेतील मुख्य संशयित प्रसाद सुभाष खडपकर (40, रा. देवगड) व विनोद विलास जुवाटकर (30, रा. पडवणे) यांच्याविरुद्ध देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दोन्ही संशयितांना देवगड न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना 29 जुलै रोजी सकाळी 10 ते 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या कालावधीत घडली.
देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुख्य संशयित प्रसाद खडपकर याने पीडित महिलेची ओळख काढून तिचा मोबाईल नंबर मिळविला. त्यानंतर त्याने पीडित महिलेला फोन करून ‘तुझे अश्लिल फोटो माझ्याकडे आहेत. मी जेव्हा मेसेज व कॉल करेन, तेव्हा तू माझ्याशी बोलायचे व मला अश्लिल फोटो पाठव. तू फोटो नाही पाठविलेस तर मी तुझ्या नवऱयाला सांगेन’, असे धमकावले. त्यानंतर 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला संशयित प्रसाद खडपकर याने देवगडातील एका रस्त्यावर बोलावून घेतले. तेथे तिला लाल रंगाच्या वाहनात बसवून निर्जन स्थळी नेले. तेथे दुसरा संशयित विनोद विलास जुवाटकर याला प्रसादने वाहनात घेतले. त्यानंतर त्या दोन्ही संशयितांनी पीडित महिलेला चाकूचा धाक दाखवत 25 हजार रुपये किंमतीचे दहा ग्रॅमचे मंगळसूत्र, 50 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, 50 हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगडय़ा, पाच हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन कुडय़ा असा एक लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तसेच तिच्या हातातील पाकीट हिसकावत त्यातील एटीएम कार्ड, ग्रीन कार्ड संशयितांनी घेतले. त्यानंतर वाहनातच तिचा विनयभंग केला. घडलेल्या प्रकाराबाबत पीडित महिलेने देवगड पोलिसांत फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी प्रसाद खडपकर व विनोद जुवाटकर या दोन्ही संशयितांविरुद्ध भादंवि कलम 392, 384, 354, 354 ब, 365, 500 व आयटी ऍक्ट 67 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
संशयितांना पोलीस कोठडी
दरम्यान, देवगड पोलिसांनी दोन्ही संशयितांना शनिवारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. या घटनेच्या तपासासाठी देवगड पोलिसांनी न्यायालयाकडे संशयित आरोपींसाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, संशयित आरोपींचे वकील कौस्तुभ मराठे यांनी पोलिसांच्या या मागणीवर हरकत घेत केलेल्या युक्तिवादावर देवगड न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपास देवगडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले करीत आहेत.









