भारतातील माझ्या बांधवांनो,
मोठय़ा आशेने मी तुमच्याकडे आलो होतो. चार दिवस एकत्र काढावेत. एकमेकांच्या देशातील गमती जमती सांगाव्यात, अनुभवांची देवाणघेवाण करावी आणि काही मानवांना ठार करून आपल्या देशात परत जावं एवढीच माझी इच्छा होती.
माझे पणजोबा तुमच्याच देशातले. हॅन्डवॉश वगैरेच्या बाटल्यांवर नीट पहा. त्यांच्या लेबलवर माझ्या पणजोबांचे नाव दिसेल. साबण, हॅन्डवॉश आणि सॅनिटायझर्सच्या टोळय़ांशी झुंजताना माझे पणजोबा आणि त्यांची अख्खी पिढी धारातीर्थी पडली. तुमच्या देशातील लोकांनी माझा घोर अपमान केला. तुमच्या देशातील शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी एखादं औषध किंवा लस वगैरे शोधून काढून मला ठार केलं असतं तर मला वाईट वाटलं नसतं. ज्या देशात एकेकाळी माझ्या पणजोबांच्या अख्ख्या पिढीने साबणासारख्या शत्रूशी लढताना देह ठेवले होते त्या भूमीवर हुतात्मा व्हायला मला नक्कीच आवडलं असतं. पण ते शक्मय नव्हतं.
टीव्हीवरच्या लोकांनी माझ्याबद्दल थापा प्रसृत केल्या. माझ्यामुळे तुमच्याकडच्या इतर गोष्टींवरून जनतेचं लक्ष विचलित झालं. तुमच्याकडे मंदी आहे, नोकऱया नाहीत, बँका बंद पडत आहेत, मराठी शाळा बंद पडल्या आहेत, धरणे पूर्ण भरली तरी पाणीकपात चालू आहे, कुठे पाण्याची टंचाई असतानाच दारूच्या कारखान्यांना मुबलक पाणी मिळते आहे, पण टीव्हीवर फक्त माझीच चर्चा चालू आहे.
व्हॉट्सअपवाल्यांनी माझ्या नावावर फालतू विनोद पसरवले. एकानं लिहिलं की कोरोना मेड इन चायना आहे. फार दिवस टिकणार नाही. एकानं लिहिलं की मृत्यू देखील मेड इन चायना येऊ लागला. काही मूर्खांनी मला अडवण्याचे बालिश उपाय व्हॉट्सअपवर सुचवले. गायीच्या शेणाने भिंती सारवणे, तुळशीचा काढा, निलगिरी तेल, लसूण वगैरे. उत्तरेकडे व्हायरस बाबा नावाच्या साधूने माझ्यापासून संरक्षण करण्यासाठी कोरोना ताईत बनवला आहे आणि तुमच्या देशातले खुळे लोक तो ताईत दोन दोन हजार रुपयांना विकत घेत आहेत. पण मी मायदेशी परत जायचं ठरवलं… कारण-तुमच्याकडचे कवी, मंत्री माझ्यावर चारोळय़ा करतील अशी भीती वाटते. मी शास्त्रज्ञांना, डॉक्टरांना भीत नाही, पण कवींना भितो. म्हणून मी परत चाललोय. तुम्ही स्वच्छता आणि आरोग्याचे नियम पाळलेत तर मला पुन्हा तुमच्याकडे यावंसं वाटणार नाही.
तुमचा,
कोरोना (सन ऑफ वटवाघूळ)








