वार्ताहर/ लांजा
लांजा महिला निरीक्षण बालगृह येथून पलायन केलेल्या मुलीबरोबर बालविवाह केल्याप्रकरणी सोलापूर येथील युवक व त्याला सहकार्य करणाऱया मित्रांसह कुटुंबियांवर लांजा पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बळीराम(देवळगनी ता. भूम, जि. उस्मानाबाद), साजन (मोडलिंब ता. माठा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. लांजा महिलाश्रम येथे 2 अल्पवयीन मुलींना ठेवण्यात आले होते. 7 जानेवारी रात्री 1.15च्या दरम्यान या दोन मुली महिलाश्रम येथून पळून गेल्याने लांजा पोलिसात याबाबत महिलाश्रम प्रशासनाकडून खबर देण्यात आली होती. या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने लांजा पोलिसांनी त्यांचा तातडीने शोध सुरू केला होता. त्यातील एका मुलीचा मित्र हा विजापूर येथील असल्याने लांजा पोलीस पथक तिच्या तपासासाठी विजापूर येथे दाखल झाले होते. मात्र ही मुलगी विजापूर येथे न गेल्याने पोलिसांना माघारी परतावे लागले. जातेवेळी या मुलींनी महिलाश्रमातील कर्मचाऱयांचा मोबाईल घेवून गेल्या होत्या. याच मोबाईल नंबरवरून सिडीआर प्राप्त करून पोलीस टॉवर लोकेशन मिळवत होते, मात्र नियमित हे लोकेशन बदलत असल्याने नेमका ठावठिकाणा लागताना पोलिसांना अडचणी भासत होत्या.
मुली प्रथम पनवेल, त्यानंतर कोल्हापूर, मिरज असा रेल्वेने प्रवास करीत होत्या. रेल्वेने मिरजहून प्रवास करीत असताना याच रेल्वे डब्यात 2 तरूण होते. पंढरपूर ते कुर्डुवाडी प्रवासादरम्यान या दोन मुलींबरोबर त्या दोन मुलांची ओळख झाली. या अल्पवयीन मुलींनी आमच्या घरी कोणीच नाही, असे सांगितल्याने त्यांच्या बोलण्यावर दोन मित्रांनी विश्वास ठेवला. यातील बळीराम तर साजनने त्यांची कहाणी ऐकून या मुलींना आसरा देण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी या दोघा मुलींना आपापल्या घरी घेवून गेले. त्यामधील साजनकडे 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी गेली तर बळीरामबरोबर 15 वर्षीय मुलगी रहावयास गेली होती. साजनच्या घरी गेल्यानंतर त्या मुलीने आपले कोणी नाही, असे सांगितले. तिच्या बोलण्यावर साजनच्या घरच्या मंडळीनी विश्वास ठेवत साजन व त्या मुलीचे लग्न लावून दिले.
याचवेळी मोबाईल लोकेशन अचूक मिळाले आणि पोलिसांची तपास चक्र गतिमान झाली. त्यानंतर लांजा पोलीस स्थानकाचे पोलीस हेडकॉन्टेबल उदय धुमास्कर, धनाजी सुतार, सुनील पडळकर, शांताराम पंदेरे, दिपाली भोपळे यांचे पथक सोलापूर व उस्मानाबाद येथे हजर झाले. येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने 17 जानेवारी रोजी रात्री 10.30 वा. दोघी अल्पवयीन मुली व त्यांच्यासमवेत असणाऱया युवकांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता साजनने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर लग्न केल्याचे निष्पन्न झाल्याने साजनसह त्याचा मित्र व कुटुंबातील एकूण 5 जणांविरुद्ध बालविवाह केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत. शनिवारी त्यांना लांजा न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. लांजा पोलिसांनी या 2 अल्पवयीन मुलींचा शोध घेवून केलेल्या कामगिरीबद्दल जनतेतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे .









