लालासाहेब दडस / दहिवडी :
अनेक संकटावर मात करत राजकारणातून समाजकारणाला जोड देणाऱ्या व बचत गटाच्या माध्यमातून शंभराहून जास्त निराधार महिलांचे संसार उभे करणाऱ्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या व दुष्काळाशी झुंज देत उजाड माळरानावर भाज्यांचे मळे फुलवणाऱ्या प्रगतशील शेतकरी वैशाली बाबासो विरकर यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला लेखाजोखा…
दस्तुरखुद्द देशाचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या घरी येऊन वैशाली मामूशेठ विरकर यांच्या कार्याचे कौतुक केले, अशा येळेवाडी (ता. माण) या छोटय़ा खेडय़ाच्या माळरानावर शेतीला आधुनिकतेची जोड देत व शेतीला पूरक उद्योग जोडून वैशालीताईंनी शेती फुलवली. त्यांचा जास्त भर भाजीपाला या नगदी पिकावरच आहे.
माळरानावरही फुलवली बागायत शेती
बचत गटाच्या महिलांना त्या आपल्याबरोबर घेऊन शेतात भेंडी, गवार, मिरची, काकडी, दूधी भोपळा, वाटाणा, वांगी, कांदा, बटाटा या पिकाचे उत्पादन घेतात. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रीय खताच्या जोरावर ही पिके घेतल्यामुळे त्यांच्या भाजीपाल्याला सातारा, कराड, कोल्हापूर, मुंबई, पुणे या ठिकाणी चांगली मागणी आहे. या शेतीतून त्यांना वर्षाला सर्व पिकातून व कृषी पूरक व्यवसायातून साधारण पन्नास लाखापर्यंत उत्पन्न मिळते. या पिकांबरोबरच त्यांनी शेतात चंदन व डाळींब याची पण लागवड केली आहे. स्वकष्टातून पन्नास एकर माळरान शेती खरेदी करून ती विकसित केली आहे. पाच किलोमीटरवरुन पाणी आणून शेती हिरवीगार करुन नंदनवन केले आहे.
माडग्याळ जातीच्या मेंढय़ाचे पैदास केंद्र उभारले
शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी माडग्याळ जातीच्या मेंढय़ाचे पैदास केंद्र उभारले आहे. येथे माडग्याळ जातीच्या मेंढय़ाच्या नराची पैदास केली आहे. त्यासाठी त्यांनी 1 लाख रुपये किमतीचे माडग्याळ जातीचा नर खरेदी केला आहे. त्याचे सध्या वजन 100 किलोच्या आसपास आहे. त्यामुळे दुष्काळी माण देशातील मेंढपाळांना चांगल्या जातीचा नर या केंद्रावर मिळत असल्याने त्यांच्या उत्पादनात ही वाढ झाली आहे.
वैशालीताईंना सर्व बचत गटाच्या महिलांबरोबरच पती मामूशेठ विरकर यांची मोलाची साथ मिळत आहे. अनेक बचत गटातील महिलांना शिलाई मशिन, शेळीपालन, कोंबडय़ा पालन, भाजीपाला स्थानिक मार्केटला विकणे, बांगडय़ा व्यवसाय इत्यादी काढून देऊन त्यांचे संसार उभे केले आहेत.
कणखर स्वभाव अन् स्वाभिमानी बाणा
आज प्रत्येक क्षेत्रात महिला प्रगती करतायत त्यात वैशाली दुष्काळाशी दोन हात करीत झुंज देऊन उजाड माळरानावर भाज्यांचे मळे फूलवत आहेत त्यात वैशालीताईंची माणुसकी आणि साधेपणा सर्वांना जास्त भावतो. त्यांनी समाजासाठी केलेले कार्य व धडपड कायमच इतरांना प्रेरणा देते. त्यांचा कणखर स्वभाव स्वाभिमानी बाणा यामुळे त्यांच्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांच्या कणखर स्वभावामुळेच त्यांनी स्वतःवरचीच नव्हे इतर गोरगरीब जनतेवरची संकटेही परतवून लावली. अशा समाजसेवी वैशालीताईंच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा…

विविध संस्थांवर काम करण्याची संधी
विद्यमान रासप जिल्हाध्यक्ष पती मामुशेठ विरकर हे पहिल्यापासुनच समाज व राजकारणात असल्यामुळे वैशालीताईंना बिजवडी विकास सेवा सोसायटीच्या काही काळ चेअरमन तर सलग 15 वर्ष संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच जिल्हय़ात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका म्हणून 15 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली. नुकत्याच झालेल्या माण कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. प्रत्येक संस्थेवर त्यांनी उठावदार कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. अशी दैदिप्यमान कामगिरी करत त्यांना विविध संस्थांवर काम करण्याची संधी मिळाली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे पत्नीची जशी साथ असते तशी यशस्वी वैशालीताईंच्या मागे त्यांचे पती मामुशेठ विरकर नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माणच्या राजकारणात मामुशेठ विरकर या नावाचा मोठा दबदबा आहे.
वैशालीताईंच्या उपक्रमाची मान्यवरांकडूनही दखल
वैशालीताईनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग नेहमीच राबविले आहेत. त्याचबरोबर आधुनिक गोशाळा, शेळीपालन, मेंढीपालन इ. शेतीपुरक व्यवसायही उत्कृष्ट उभे केले आहेत. हे पाहण्यासाठी देशाचे तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार, विद्यमान विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, आमदार जयकुमार गोरे यांनी शेती व शेतीपुरक व्यवसायाला भेटी देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. तसेच ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.









