जि.प.शिक्षण विभागाची योजना, शिक्षकांचाही हातभार : सन 2018-19 मध्ये 5 हजार 888 विद्यार्थींनींना अनुदान लाभ
प्रतिनिधी / रत्नागिरी
कठोर झालेल्या नियतीमुळे मायेचे छत्र हरपलेल्या कन्यारत्नांसाठी संवेदनशीलतेने हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना हाती घेण्यात आली. त्या निराधार विद्यार्थींनींना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांना मदत म्हणून सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेतून निराधार विद्यार्थींनींना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जात आहे. या योजनेचा सन 2018-19 मध्ये जिल्हय़ातील 5888 विद्यार्थींनींना लाभ देण्यात आला आहे.
आईवडिलांचे छत्र हरविलेल्या मुली, अस्थिव्यंग आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुलींसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ही योजना राबवली जात आहे. त्याअंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावरून अशा निराधार मुलींची या योजनेसाठी दरवर्षी निवड केली जाते. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या या मुलींना शिक्षणात अडसर येऊ नये आणि किमान त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी फूल ना फुलाची पाकळी या धर्तीवर प्रत्येक विद्यार्थीनीला मदत उपलब्ध करून दिली जाते. तालुकास्तरावर पात्र ठरलेल्या लाभार्थी कन्यारत्नांना धनादेशाद्वारे मदत उपलब्ध करून दिली जाते.
रत्नागिरी जिल्हय़ात या योजनेच्या माध्यमातून जून 2018-19 या वर्षात 17 लाख 66 हजार 400 रुपयांचा निधीचा लाभ देण्यात आला. हा शिक्षणाधिकाऱयांच्या अधिकारात बँकेत जमा करण्यात येणाऱया निधीच्या मिळणाऱया व्याजातून विद्यार्थींनींना दरवर्षी या योजनेचा लाभ दिला जात आहे. या निधीतून जिल्हय़ातील प्राथमिकच्या 5 हजार 770 तर माध्यमिकच्या 118 निराधार विद्यार्थींनींना आर्थिक लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे निराधार विद्यार्थींनींना शिक्षणासाठी मोलाचा हातभार लाभला आहे. त्यांच्या शिक्षणाचा मार्ग काही प्रमाणात का होईना सुलभ होत आहे.
या योजनेतून जिल्ह्यात एकूण प्राथमिकच्या 5 हजार 770 तर माध्यमिकच्या 118 लाभार्थी मुलींना लाभ देण्यात आला आहे. त्यात प्राथमिकच्या लाभार्थींना 17 लाख 31 हजार तर माध्यमिकच्या लाभार्थींना 35 हजार 400 रुपये आर्थिक लाभ दहा महिन्यांसाठी देण्यात आला. त्यात मंडणगड- प्राथमिक 357 तर माध्यमिक 8 लाभार्थी, दापोली- प्राथमिक 594 तर माध्यमिक 12 लाभार्थी, खेड- प्राथमिक 1012 तर माध्यमिक 21 लाभार्थी, चिपळूण- प्राथमिक 714 तर माध्यमिक 14 लाभार्थींचा समावेश आहे. गुहागर- प्राथमिक 357 तर माध्यमिक 8 लाभार्थी, संगमेश्वर- प्राथमिक 951 तर माध्यमिक 19 लाभार्थी, रत्नागिरी- प्राथमिक 714 तर माध्यमिक 14 लाभार्थी, लांजा – प्राथमिक 357 तर माध्यमिक 8 लाभार्थी, राजापूर- प्राथमिक 654 तर माध्यमिक 13 लाभार्थी, नगर परिषद- माध्यमिक 60 तर प्राथमिक 1 लाभार्थ्यांचा समावेश होता.
या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आर्थिक मदत
तालुका एकूण रक्कम
मंडणगड 109500
दापोली 181800
खेड 309900
चिपळूण 218400
गुहागर 109500
संगमेश्वर 291000
रत्नागिरी 218400
लांजा 109500
राजापूर 200100
नगर परिषद 18300