माजी आमदार प्रमोद जठार यांचा सवाल
वार्ताहर / कणकवली:
मुंबईतून येत वाहनांच्या ताफ्यासह जिल्हय़ात फिरणारे सत्ताधरी नेते स्वतःला हवे, तेव्हा नियम डावलणार असतील, तर सगळे कठोर नियम फक्त मुंबईत लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या सामान्य कोकणवासीयांसाठीच आहेत का? त्यांच्यासाठीच हा वेगळा न्याय का? अन्याय करण्यासाठी या सरकारने जाणीवपूर्वक कोकणी माणूसच निवडला आहे का? कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याची दक्षता बाळगण्याएवढी कोकणी जनता सुज्ञ आहे. मुंबईतील कोकणवासियांना गावी पाठविले, तर मुंबईवरचा ताणही कमी होईल. कोकणात गरज नसताना फिरून आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखविण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा खासदारांनी चाकरमान्यांना कोकणात आणून त्यांची गरज पूर्ण करावी, असे आवाहन माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले आहे.
जठार यांनी म्हटले आहे, मुंबईतून कोकणात येणाऱया लोकप्रतिनिधींना वैद्यकीय अधिकाऱयांच्या निगराणीखाली पाच दिवस ‘होम क्वारंटाईन’ राहणे आवश्यक असल्याचे शासकीय निर्देश आहेत. मात्र, त्याची ऐसी की तैसी करत खासदार विनायक राऊत कोकणात बैठका घेत आहेत. सत्ताधारी लोकप्रतिनिधी नियम डावलत असल्याने त्यांच्या या सत्तेच्या गैरवापराबाबत जनतेतून संताप व्यक्त होत आहे. कोकणी माणसाचे मुंबईतले जीवन आता तर अगदीच असहय़ झाले आहे. अनेक गैरसोयींमुळे त्यांचा संयम सुटत चाललेला आहे. गावच्या वातावरणात अधिक सुरक्षित राहू, अशा काकुळतीच्या भावना कोकणी जनता व्यक्त करत आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे सहकार्य करत आवश्यक त्या सर्व आरोग्य तपासण्या करून घेण्याची व गावी जाऊन क्वारंटाईन होऊन राहण्याची त्यांची पूर्ण मानसिकता आहे. मात्र, सरकार त्यादृष्टीने निर्णय घेत नाही. याचा संताप कोकणवासियांमध्ये आहे.
ज्या कोकणवासीय चाकरमान्यांनी मुंबईसह कोकणात शिवसेना वाढविली, त्या चाकरमान्यांचा जीव वाचवायची वेळ आली, तेव्हा त्यांच्यासोबत सरकार उभे राहत नाहीय. कोकणी जनतेला संकटात वाऱयावर सोडून आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन कोकणभर फिरणाऱया राऊत यांनी ही बाब लक्षात घ्यावी. वेळ आल्यावर शिवसेना कशी वागू शकते हे चाकरमान्यांना यातून कळून चुकले आहे. इतर जिल्हय़ातील ऊस तोडणी कामगार, परप्रांतीय मजूर यांना घराकडे सुखरुप पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकार लक्ष जातिनिशी देते. पण जो कोकणी माणूस मुंबईत अडकून पडला आहे, तो शिवसेनेला दिसत नाही, असे जठार यांनी म्हटले आहे.
चाकरमान्यांना गावी आणण्याची व्यवस्था करा!
मुंबईतल्या परप्रांतियांना त्यांच्या राज्यात सुखरुप पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारकडे परवानगी मागत आहेत. त्यांच्यासाठी खास रेल्वे सोडण्याची मागणी करत आहेत. परराज्यातील मजूर मुख्यमंत्र्यांना दिसतो. पण आपल्या राज्यातील कोकणी माणूस त्यांना कसा दिसत नाही? कोकणात जाऊन लवाजम्यासह फिरत पक्षीय राजकारण करण्यापेक्षा राऊत यांनी कोकणवासीय चाकरमान्यांची काळजी घेत या चाकरमान्यांना गावी येण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी जठार यांनी केली आहे.









