कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा महापालिका आयुक्तांचा आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने क्लोजडाऊन जारी करण्यात आला आहे. शासनाने यापूर्वीच केवळ अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश बजावला आहे. याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीही काही शोरुम्स, कापड दुकाने आणि हॉटेल्स असे विविध व्यवसाय सुरू ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी शहरातील दुकानांची पाहणी करून दंडात्मक कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्लोजडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी मंगळवार रात्रीपासून करण्यात येत आहे. पण कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शासनाने प्रारंभी केवळ नाईट कर्फ्यु आणि विकेण्ड कर्फ्युची घोषणा केली. मात्र, नाईट कर्फ्यु लागू केल्यानंतर लागलीच दुसऱया दिवशीपासून अनावश्यक व्यवसाय बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून शहरातील कपडय़ांची शोरुम्स, सराफी दुकाने, मोबाईल शोरुम्स, वाहनांचे शोरूम्स, बार, जलतरण तलाव, चित्रपटगृहे असे विविध व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे. केवळ अत्यावश्यक साहित्याची दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. क्लोजडाऊनची अंमलबजावणी आणि कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश शासनाने बजावला आहे.
आयुक्तांचा शहरात फेरफटका
महापालिकेने आठ पथकांची नियुक्ती केली असून राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना नियमावलीचे पालन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी शहर आणि उपनगरात फेरफटका मारून माहिती घेतली. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू केलेल्यांना व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. पथकाने शहरात अनावश्यक सुरू करण्यात आलेल्या मॉल, कपडय़ांची दुकाने, हॉटेल, तसेच विविध शोरूम्सना नोटीस बजावण्याची कार्यवाही केली. शहर आणि उपनगरांतील विविध दुकानांवर कारवाई करून नोटीस बजावण्यात आली. दंडही वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्यावतीने आठ पथके नियुक्त करण्यात आली असून कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱया व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी शहरातील विविध भागात कोरोना नियमावलीचे उल्लंघन केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करून 22,800 रुपये दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.
क्वॉरंटाईन नागरिकांवर नजर ठेवण्याची सूचना
शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून कठोर निर्बंध आणि क्लोजडाऊनचा आदेश जारी करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱयांसह कुटुंबातील सदस्यांना होम क्वारंटाईन करण्याची सूचना करण्यात आली आहे. क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी घरी जावून दररोज छायाचित्र ऍपद्वारे अपलोड करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱयांवरील ताण पुन्हा वाढला आहे.
महापालिका कार्यालयातील सात कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाल्याने महापालिका कार्यालयात गोंधळ उडाला आहे. कोरोनाचे नियम पाळा, मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा आणि आपले आरोग्य सांभाळा असे सांगणाऱया मनपा कर्मचाऱयांनाच कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका कार्यालयातील सात कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच विविध जबाबदाऱया महापालिकेच्या कर्मचाऱयांवर सोपविण्यात येत आहेत.
मागील वर्षी कोरोना कालावधीत कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱयांवर सोपविली होती. परराज्यांमधून येणाऱया नागरिकांना क्वॉरंटाईन करून त्यांच्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने क्वारंटाईन करण्याचे काम थांबविले होते. आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासन अडचणीत आले आहे.
कोरोनाचा कहर वाढत चालल्याने दररोज नव्या नियमावलींची भर पडत आहे. आता पुन्हा क्वॉरंटाईन करण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. परराज्यांतील तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन करून त्यांच्यावर नजर ठेवण्याची सूचना महापालिकेच्या कर्मचाऱयांना करण्यात आली आहे. दररोज भेट देऊन त्यांचे छायाचित्र ऍपद्वारे अपलोड करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱयांना आता शहरात पुन्हा भटकंती करून क्वॉरंटाईन नागरिकांवर नजर ठेवावी लागणार आहे.









