प्रवाशांना दिलासा : पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक मार्गांवर बसेस
प्रतिनिधी / निपाणी
गेले वर्षभर बंद असलेली निपाणी आगाराची आंतरराज्य बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक या मार्गांवर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस धावत आहेत. महाराष्ट्रात अजूनही परिवहन कर्मचाऱयांचे आंदोलन सुरू असल्यामुळे त्याचा व्यावसायिक लाभ घेण्यासाठी निपाणी आगार सज्ज झाले आहे.
कोरोना संसर्गामुळे 2020 साली कर्नाटक व महाराष्ट्र दरम्यान होणारी बस वाहतूक सुमारे सहा महिने बंद होती. पहिली लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात बससेवा सुरू झाली. मात्र, दुसऱया लाटेवेळी पुन्हा बससेवा थांबविण्यात आली. कर्नाटक सरकारने राज्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकही बस कर्नाटकात आली नाही. अशातच महाराष्ट्रात परिवहन कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात बससेवा सुरू आहे.
कोल्हापुरातून निपाणीमार्गे गडहिंग्लज बससेवा सुरू असली तरी निपाणी बसस्थानकात मात्र अद्याप बस आलेली नाही. अशातच निपाणी आगारातून महाराष्ट्रात बससेवा सुरू होती. मात्र, बस कोल्हापूर स्थानकात जाण्याऐवजी बाहेर महामार्गावरील तावडे हॉटेलपर्यंतच जात होती. गेल्या दोन दिवसांपासून बसस्थानकानजीक निपाणी आगाराच्या बसेस जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. निपाणीतून कोल्हापुरात दैनंदिन कामासाठी तसेच शिक्षणासाठी जाणाऱया कर्मचारी, विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ही बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
स्थानिक बसफेऱयाही वाढल्या
दरम्यान, गेले सहा महिने स्थानिक बसफेऱया अत्यल्प प्रमाणात होत्या. आता प्रवासी वाढत असल्यामुळे स्थानिक भागातही बसफेऱया वाढविल्या जात आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱया वाढविल्या जात असल्याचे निपाणी आगारातर्फे सांगण्यात आले आहे. एकंदरीत आंतरराज्य बससेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.









