व्यापकबैठकीतमहत्त्वपूर्णनिर्णय:बुधवारपासूनहोणारकार्यवाही
वार्ताहर/ निपाणी
निपाणी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याचा हा परिणाम आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास रुग्णसंख्या वाढून मोठे संकट उभे राहणार आहे. हे लक्षात घेऊन निपाणीत शनिवारी तातडीची सर्वसमावेशक बैठक बोलविण्यात आली होती. महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपस्थित सर्वांची मते जाणून घेऊन बुधवार 15 पासून सात दिवस निपाणीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रारंभी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनी प्रास्ताविकात तालुक्यातील कोरोना रुग्ण, क्वारंटाईन संख्या व आरोग्य विभागाकडून सुरू असलेली कार्यवाही याची माहिती दिली. यानंतर उपस्थित किराणा, कापड, स्टेशनरी, सराफ, भांडी अशा विविध व्यापाऱयांसह नागरिकांनी आपापली मते मांडताना लॉकडाऊन करण्याविषयी सांगितले. काही उपस्थितांनी दिवसभरात दोन ते तीन तासांची मुभा देऊन लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी, असे सुचविले. तर काहींनी लॉकडाऊन करण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक नियमांचे पालन करण्यासाठी वाढीव दंडात्मक कारवाई करावी, असे नमूद केले.
सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर बोलताना खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग एक चिंता आहे. निपाणी काही प्रमाणात अजून सुरक्षित असली तरी येत्या दिवसात धोका वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. रुग्ण व क्वारंटाईन संख्या वाढल्यास प्रशासनासमोर नियोजनाचे आव्हान निर्माण होणार आहे. यासाठी कोरोना संसर्ग साखळी तोडण्याकरिता बुधवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सात दिवसांकरिता लागणाऱया वस्तूंची खरेदी करण्याकरिता सोमवार व मंगळवारी मुभा दिली आहे, असे सांगितले.
प्रत्येकाने सजग व्हायला हवे
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येकाने सजग व्हायला हवे. बाहेरील शहरातून गावी परतणाऱया प्रत्येकाची माहिती प्रशासनाला कळविण्याचे कर्तव्य पार पाडा. सात दिवस कडक लॉकडाऊन पाळून साखळी तोडण्याचे प्रयत्न होतील. यानंतर पुढची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल. जनतेच्या हितार्थ हे कडक लॉकडाऊन असून अंमलबजावणी करावी. असे सांगताना कडक लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असे सांगितले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, सीपीआय संतोष सत्यनायक, आयुक्त महावीर बोरण्णावर, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, सुरेश शेट्टी, भरत चव्हाण, अविनाश मानवी, प्रवीण शाह, सोनल कोठडीया, शैलेश पारेख, राज पठाण, श्रीमंधर देसाई, अभय मानवी, पारस गांधी, उपासना गारवे, सुनील राऊत यांच्यासह अनेकांनी विचार मांडले. बैठकीला तालुकास्तरीय सर्व विभागाचे अधिकारी, नगरसेवक, नागरिक, व्यापारी व महिला उपस्थित होत्या.









