प्रतिनिधी/ निपाणी
सुमारे 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता निपाणीत 24 तास पाणी योजना कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. महिन्याभरात निपाणीकरांना 24 तास पाणी देण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. असे असताना सध्या शुद्ध पाणी पुरवठा करताना अनेक अडथळे येत असल्याचे चित्र दिसत आहे. जवाहर तलाव आवारातील शुद्ध पाणी प्रकल्पातील वाळू गेल्या 15 वर्षात न बदलल्याने पाणी शुद्धीकरणाची क्षमता घटली आहे. परिणामी शहरवासीयांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे.
वेदगंगा नदीतून थेट जवाहर तलावात पाणी आल्यानंतर या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी प्रकल्पात वाळू हा अत्यावश्यक घटक आहे. साधारणपणे पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील वाळू दर दहा वर्षांनी बदलणे आवश्यक आहे, असे असताना गेल्या 15 ते 16 वर्षात वाळूच बदलण्यात आलेली नाही. याचा परिणाम म्हणून 100 टक्के पाणी शुद्धीकरण होताना दिसत नाही. तसेच पाणी शुद्धीकरणाची गतीही वाळूअभावी कमी झाली आहे. त्यामुळे सुमारे लाखभर लोकसंख्येला शुद्धी पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहे.
वाळू बदलण्याचा प्रयत्न पण एम-सँड वाळूमुळे फेल
सध्या 24 तास पाणी योजनेची चाचणी बऱयापैकी यशस्वी झाली आहे. त्यामुळे महिन्याभरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी सुरू आहे. सध्या जवाहर तलावात 41 फूट 9 इंच इतका पाणीसाठा असल्याने 24 तास पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी पाण्याची कमतरता नाही. असे असले तरी पाणी पुरवठा करताना ते शुद्ध असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे शुद्धीकरण प्रकल्पातील वाळू बदलणे अत्यंत आवश्यक बनले आहे. दोन वर्षापूर्वी वाळू बदलण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी एम-सँड वाळू वापरण्यात आल्याने त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता
15 वर्षापासून वाळू न बदलण्यात आल्याने सध्या असलेल्या वाळूची झीज होऊन चिकटपणा अधिक आला आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरणात अडथळे येत आहेत. गेल्या काही दिवसात थंडी, धुके, उष्णता अशाप्रकारच्या विचित्र वातावरणामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दवाखान्यात उपचारासाठी गर्दी होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा झाल्यास आजारात अधिकच भर पडू शकते. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शुद्धीकरण प्रकल्पातील वाळू बदलण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









