बानू नदाफ यांची धडपड कौतुकास्पद : लॉकडाऊनमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप
प्रतिनिधी / निपाणी
लॉकडाऊन काळात दिवसेंदिवस निर्बंध कडक होत असल्याने हातावरचे पोट असणाऱयांना अनेक अडचणी येत आहेत. अशा स्थितीत निपाणीत माहेरी अडकलेल्या महिलेने नगरपालिकेची परवानगी घेऊन सासरहून मदत मागवत गरजूंना अन्नधान्याचे वाटप सुरू ठेवले आहे. बानू इक्बाल नदाफ (रा. कोल्हापूर) असे सदर महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बानू यांचे सासर कोल्हापूर असून गेल्या महिन्यात त्यांचा मुलगा लकी याला उन्हाळी सुटी पडल्याने त्याला माहेरी निपाणीत हुडको कॉलनी येथे सोडण्यासाठी आल्या होत्या. येथे दोन दिवस राहून परत सासरी कोल्हापुरला जाण्याच्या तयारीत असताना सरकारतर्फे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बानू यांना नाईलाजास्तव इथेच थांबावे लागले. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत त्या घरीच असताना अन्य ठिकाणी मात्र हातावरचे पोट असणाऱया गोरगरिबांना अन्नधान्याअभावी येणाऱया अडचणी पाहून त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार सासरी कोल्हापुरला फोन करून आवश्यक अन्नधान्ये मागवली. यानंतर निपाणीतील वडर गल्ली, आंदोलन नगरातील काही भाग तसेच अर्जुननगर येथे रस्ते डांबरीकरण करणाऱया कुटुंबांना खाद्यतेल, तांदूळ, मैदा, तूरडाळ अशा किटचे वितरण सुरू ठेवले आहे. बानू या कोल्हापुरात रणमर्दानी मंच, रॉबिनहूड तसेच इमाद फाऊंडेशन आदी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. माहेरी असतानाही गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरविण्यासाठी त्यांची चाललेली धडपड निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे. त्यांना वडील निस्सार नदाफ, आई जरीना नदाफ, लकी नदाफ, दत्ता संकपाळ यांचे सहकार्य मिळत आहे.
सामाजिक सेवेची आवड
यासंदर्भात बोलताना बानू नदाफ म्हणाल्या, आपल्याला लहानपणापासून सामाजिक सेवेची आवड आहे. सासरीदेखील खंबीर पाठबळ मिळत असल्याने आजवर विविध उपक्रम राबवले आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने निपाणीत अनेक कुटुंबांना अन्नधान्याची अडचण दिसून आली. त्यामुळे नगरपालिकेच्या परवानगीने कोल्हापूरहून अन्नधान्य मागवून गरजूंना त्याचे वाटप केले जात आहे. यापुढेही हा उपक्रम राबवणार असून नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.









