प्रतिनिधी/ निपाणी
गत पंधरा दिवसांपासून निपाणी शहरात चोरीच्या घटनांची मालिका सुरूच आहे. काही अपवाद वगळता चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. असे असतानाच गुरुवारी रात्री येथील निराळे गल्लीत प्राध्यापकाचे दोन मजली घर फोडून चोरटय़ांनी 35 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. संतोष ईश्वर कोळकी असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष कोळकी हे येथील निराळे गल्लीत वास्तव्यास आहेत. ते येथील व्हीएसएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावत आहेत. गुरुवारी ते आपल्या कुटुंबीयांसह संकेश्वर येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त गेले होते. हीच संधी साधून चोरटय़ांनी गुरुवारी रात्री बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी तेथील तिजोरी फोडून 5 तोळे सोन्याचे दागिने तर दुसऱया मजल्यावरील कपाटातील 30 तोळे सोन्याचे दागिने लांबविले. यावेळी त्यांनी घरातील अन्य भागातही साहित्य विस्कटून आणखीन ऐवज मिळतो का याची शोधाशोध केल्याचे घटनास्थळी विस्कटलेल्या साहित्यावरून लक्षात येते. लंपास केलेल्या दागिन्यांमध्ये 3 राणी हार, सोनसाखळी, अंगठय़ा, लहान मुलांच्या दागिन्यांचा समावेश असून सदर ऐवज सुमारे 18 लाखाचा आहे.
दरम्यान कोळकी कुटुंबीय शुक्रवारी सकाळी 9 वाजता संकेश्वरहून घरी परतले. यावेळी त्यांना घराचा समोरील दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. आत जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती त्यांनी तत्काळ पोलिसांना दिली. यानंतर घटनास्थळी उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, हवालदार राजू कोळी, उदय कांबळे, बसवराज नावी, गजानन भोई यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञांकडून तिजोरी आणि कपाट येथील ठसे घेण्यात आले. तर श्वान चोरी झालेल्या ठिकाणापासून लक्ष्मी मंदिरपर्यंत जात परिसरातच घुटमळले.
चोरटे आघाडीवर, पोलीस पिछाडीवर
गत पंधरा दिवसात निपाणी शहरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. येथील जुन्या पी. बी. रोडवरील काही दुकानांमध्ये किरकोळ चोरीची घटना घडली होती. यातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र हा अपवाद वगळता अन्य चोऱयांच्या घटनांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. एकूणच वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलिसांवर चोरटय़ांनी आघाडी घेतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
बंद घरेच टार्गेट
निपाणी शहरात आणि परिसरात चोरटय़ांनी बहुतांशी बंद घरे व बंद दुकानेच फोडली असल्याचे एकूण घटनांवरून स्पष्ट होते. यातून बोध घेताना नागरिकांनी बाहेरगावी जाताना किंमती ऐवज सोबत घेऊन जावा, किंवा घरी ठेवू नये. तसेच शेजारील नागरिकांना बाहेरगावी जाताना घराकडे लक्ष देण्याचे सांगणे गरजेचे आहे. याबरोबरच पोलिसांनीही वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेत रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंदच
शहरात निपाणी पालिका व पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून 30 हून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र सदर सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत. मात्र या घटनेतील चोरटय़ांचा शोध घेण्यासाठी परिसरातील खासगी सीसीटीव्ही कॅमेऱयांचा आधार घेतला जात आहे. लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले कॅमेरे बंद असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.