शहर परिसरात लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद
प्रतिनिधी/ निपाणी
कोरोना विषाणूबाबत देशासह संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे भारतात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनची सर्वत्र काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. असे असताना मंगळवारी निपाणी नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत मात्र ऐनवेळी विषयांतर होऊन भाजप व काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. अधिकाऱयांसमक्ष घडलेल्या या प्रकाराने लॉकडाऊनचा मात्र बट्टय़ाबोळ उडाल्याचे दिसून आले. यामुळे शहर व परिसरात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी निपाणी नगरपालिकेत मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, लॉकडाऊन काळात सरकारतर्फे पुरवण्यात येणाऱया सोयीसुविधा योग्य पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील. पोलीस अधिकाऱयांनी चौकशीविना लाठीच्या बळाचा वापर करु नये. चिकोडीत कोरोनासंदर्भात टेस्टींग लॅब आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी एकजुटीने कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करुया, असे सांगितले.
केवळ उज्ज्वला योजना लाभार्थींना मोफत गॅस
खासदार आण्णासाहेब जोल्ले म्हणाले, सध्या केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना मोफत गॅस वितरण होणार आहे. मात्र आगामी काळात सर्व बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरच्या पुरवठय़ासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकऱयांना शेतीमाल विक्रीसाठी अडचण होणार नाही. नोंदणीकृत कामगारांनाही शासनाच्या योजनेचा लाभ तात्काळ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी, निपाणी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. यासाठी सतर्कता म्हणून व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी तसेच शेतकऱयांचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना केली.
प्रत्येकाने एकजूट दाखवावी
माजी आमदार काका पाटील म्हणाले, कोरोनासारख्या आपत्तीचा मुकाबला करताना एक देशवासीय म्हणून एकजूट दाखवावी, अशावेळी पक्षीय राजकारण टाळावे तसेच निपाणीत बाजारासाठी करण्यात आलेली सकाळची वेळ बदलून संध्याकाळी 4 ते 7 करावी, अशी सूचना केली. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, कोरोनाचा फैलाव हा तिसऱया टप्प्यात गेल्यानंतर मास्क व सॅनिटायझरचाही उपयोग होणार नाही. हे लक्षात ठेवून सावधानता बाळगावी, असे आवाहन केले.
नागरिकांची गैरसोय टाळावी
माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी, लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी होत असताना गोरगरिबांना रेशन, गॅस तसेच आवश्यक किराणा माल योग्य पद्धतीने मिळावा, दुपटीने वाढवण्यात आलेली पेन्शन त्वरित मिळावी, शेतकऱयांना अधिक फटका बसणार नाही याकडेही लक्ष देण्याची सूचना केली.
आवश्यक त्या सर्व उपाययोजना
डीवायएसपी मनोजकुमार नाईक, तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, आयुक्त महावीर बोरण्णावर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, सीपीआय संतोष सत्यनायक यांनी लॉकडाऊनमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक संजय सांगावकर, सोनल कोठडिया, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, जयराम मिरजकर, सीपीआयचे सी. ए. खराडे, माजी नगराध्यक्षा सुनीता होनकांबळे, दिलीप पठाडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकाऱयांनी सूचना मांडल्या.
जोरदार शाब्दीक बाचाबाची
दरम्यान चिकोडी जिल्हा काँगेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, पोलिसांतर्फे जनजागृती होत असताना मंत्री शशिकला जोल्ले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. याचवेळी नाचगाण्याच्या शब्दाचा उल्लेख झाल्याने मंत्री शशिकला जोल्ले चांगल्याच संतापल्या. त्यांनी चिंगळे यांना शब्द मागे घेण्याची मागणी केली. याचवेळी भाजप नगरसेविका व काँग्रेस नगरसेवकांमध्येही जोरदार शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी उपस्थित डीवायएसपी मनोजकुमार नाईक, सीपीआय संतोष सत्यनायक यांच्यासह विविध खात्याच्या अधिकाऱयांनी बघ्याची भूमिका घेतली. सुमारे तासभर गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत गोंधळ शांत केला.
लोका सांगे ब्रह्मज्ञान…
दरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरताना त्यांच्या प्रत्येक भूमिकेचा समाजावर परिणाम होत असतो. अशावेळी याचे भान विसरलेल्या लोकप्रतिनिधींनी निपाणी पालिकेत जो गोंधळ घातला तो निश्चितच संतापजनक व निषेधार्ह आहे. एकीकडे लोकांना लॉकडाऊन काळात घरात राहून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे उपदेश द्यायचे व दुसरीकडे सर्वपक्षीय बैठकीत कोरोनाचे गांभीर्य व सोशल डिस्टन्स विसरुन गोंधळ घालणे कितपत योग्य आहे? याचा विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.









