प्रतिनिधी/ पणजी
येथील पाटो व चर्च चौकात मोले प्रकल्पा विरोधात निदर्शने करणाऱया अनेकांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर त्यांना फोंडा पोलीस स्थानकात ठेवले. संध्याकाळी उशिरा पणजी पोलीस स्थानकाचे कर्मचारी फोंडा पोलीस स्थानकात दाखल झाले व सोपस्कार पूर्ण केले.
गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात येणार असल्याने पणजी परिसरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. निदर्शने करणे किंवा धरणे कार्यक्रमांन मज्जाव केला होता. असे असतानाही राज्यात होणाऱया काही प्रकल्पाविरोधात आंदोलनकर्त्यांनी येथील चर्च चौक व पाटो येथे निदर्शने केली असता त्यांना त्वरित पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री मोठय़ाप्रमाणात आंदोलनकर्ते आरोशी येथील रेल्वे ट्रक जवळ जमले होते. त्यांनी कोळसा वाहतूक, मोले प्रकल्प व रेल्वे दुपद्रीकरणाला विरोध केला होता. शुक्रवारी राष्ट्रपती गोव्यात येणार असल्याने त्यांनी येथील चर्च चौक व पाटो येथे शांततापूर्ण निदर्शने करणे सुरु केले होते. राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी म्हणून आंदोलनकर्त्यांना त्वरित ताब्यात घेतले.









