वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संपूर्ण देशामध्ये शेतकरी आंदोलन छेडले जात असून दिल्लीत पंजाब आणि हरियानातील शेतकऱयांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत. शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील विविध ऍथलिट्स आपल्याला मिळालेले पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडे जात असताना त्यांना मध्यभागी पोलिसांनी अडविले.
शेतकऱयांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी पंजाब आणि हरियानातील अनेक क्रीडापटूंनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला असून यापूर्वी मिळालेले पुरस्कार शासनाला परत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. सोमवारी राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱया खेळाडूंमध्ये मल्ल कर्तारसिंग, हॉकीपटू गुरमेलसिंग, माजी महिला हॉकी कर्णधार रजबीर कौर यांचा समावेश होता. 1982 साली कर्तारसिंगला अर्जुन पुरस्कार तर 1987 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. ऑलिम्पिक हॉकी सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय संघामध्ये गुरमेलसिंगचा समावेश होता. गुरमेलसिंगला 2014 साली ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार रजबीर कौर हिचा 1984 साली अर्जुन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
सोमवारी राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱया मार्गावर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱया शेतकरी बांधवांवर लाठीहल्ला करून अनेक मार्ग बंद करण्यात आले होते. कडक थंडीच्या मोसमामध्ये दिल्लीमध्ये हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शासनाने अलीकडेच कृषीसंदर्भात केलेला नवा कायदा मागे घ्यावा, असे आवाहन या ऍथलिट्सनी शासनाला केले आहे.









