सांगली/प्रतिनिधी
शनिवार 26 रोजी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यांच्या हस्ते दोन महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. देशाच्या दळणवळण विकासामध्ये, गडकरी यांचे मोठे योगदान आहे. शनिवारी गडकरी यांच्या हस्ते, दोन महामार्गांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले आहे. सांगली ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील बोरगाव ते वाटंबरे दरम्यानच्या
52 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरण रस्त्याचे लोकार्पण होणार आहे. प्रकल्पाची किंमत 2 हजार 76 कोटी रुपये इतकी आहे. 22 एप्रिल 2019 ला या कामाचा शुभारंभ झाला, आणि मार्च 2022 मध्ये या टप्प्याचे लोकार्पण होत आहे.
बोरगाव ते वाटंबरे या चौपदरी रस्त्यावर एकूण वीस भुयारी मार्ग आहेत. 38 बस शेल्टर आहेत, 4 मोठे पूल, 5 छोटे पूल तर 9.1927 किलोमीटर लांबीचे सेवा रस्ते आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या चौपदरीकरणमुळे कोल्हापूर आणि सोलापूर या दोन महत्त्वाच्या शहरांमधील वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. बोरगाव ते वाटंबरे या महामार्गावरील खंडाचे, नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. नव्या महामार्गामुळे इंधन आणि प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. चार पदरी रस्ते झाल्याने रहदारी सुरक्षित होऊन, अपघातांच्या प्रमाणात घट होईल. शिवाय कृषी उत्पादनांची सुलभ वाहतूक होऊ शकेल.
सांगली ते सोलापूर या नव्या चार पदरी महामार्गामुळे, प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच सुखकर, सुरक्षित आणि जलद प्रवास होईल.
त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी, यावरील सांगोला ते सोनंद ते जत या मार्गाचे पुनर्वसन आणि उन्नतीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाची लांबी 44.784 किलोमीटर असून, प्रकल्पाची किंमत 257 कोटी रुपये आहे.
30 जून 2018 रोजी, सांगोला सोनंद ते जत या रस्त्याच्या उन्नतिकरणचे काम सुरू झाले आणि 14 मीटर रुंदीचा हा नवा रस्ता साकारला आहे. या रस्त्यावर दोन मोठे पूल तर एक छोटा पूल उभारण्यात आला आहे. तर 31 बस शेल्टर असणार आहेत. सांगोला- सोनंद ते जत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, करार नाम्यानुसार दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हा राष्ट्रीय महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, तो पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना जोडतो. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहनांच्या इंधनामध्ये मोठी बचत होणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. वाहतूक सुरक्षेत वाढ होऊन, अपघातांच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल. दोन्ही रस्त्यांचा लोकार्पण सोहळा शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता, विश्रामबाग येथील राजमती मैदानावर होणार आहे. गडकरी , यांच्यासह चंद्रकांत दादा पाटील खासदार संजय पाटील ,. आमदार सुधीर गाडगीळ व आमदार सुरेश खाडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे अध्यक्ष दिपक शिंदे आणि पृथ्वीराज देशमुख यांनी केले आहे .