झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील नचिकेत, म्हणजेच अभिनेता निखिल दामले सगळ्यांचाच लाडका आहे. ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमुळे तो घराघरात जाऊन पोचला. अनेक तरुणींच्या गळय़ातील ताईत झाला. या तरुण अभिनेत्याची स्वप्नं सुद्धा खूप मोठी आहेत.
अनेक सेलिब्रिटी मंडळींनी लॉकडाऊनकडे एक संधी म्हणून पाहिलेले आहे. सर्वजण स्वत:ला पुरेसा वेळ देत आहेत. निखिल सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात निखिल मेहनत घेत आहे.काही दिवसांपूर्वीच इन्स्टावर लाईव्ह येत, त्याने चाहत्यांशी संवाद साधला. त्याच्या या लाईव्ह सत्रात तो दिलखुलासपणे बोलत होता. त्याचं बालपण, अभिनेता होण्यासाठी त्याने केलेला प्रवास याविषयी तो मनमोकळेपणाने बोलला. पण, त्याच बरोबरीने, सध्या लॉकडाऊनच्या काळात, तो काय करत आहे, हे सुद्धा त्याने चाहत्यांना सांगितले. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळालेली असल्यामुळे त्यांच्यासोबत पत्ते आणि पॅरम, हे त्याचे आवडीचे खेळ तो खेळत आहे. पण, हे करत असतानाच, वाचन करण्यासाठी तो खूप वेळ देत असल्याचे त्याने सांगितले. आवडीची बरीच पुस्तके त्याने लॉकडाऊनमध्ये वाचली आहेत. तसेच त्याच्या आवडीच्या वेब सिरीज आणि चित्रपट पाहण्यात सुद्धा तो फावला वेळ घालवतो आहे. स्वप्नपूर्तीसाठी या गोष्टी गरजेच्या असल्याचे त्याचे म्हणणे आहे. भविष्यात हिंदी सिनेसफष्टीत अर्थातच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप पाडण्याची त्याची इच्छा आहे. आलिया भट ही त्याची सर्वाधिक आवडती अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायची संधी मिळायला हवी, असं त्याला मनापासून वाटतं. लाईव्हच्या माध्यमातून सगळय़ांशी मनमोकळा संवाद साधताना, आपल्या स्वप्नांबद्दल बोलत त्याने चाहत्यांना खूश केलं.









