डॉ. शुभदा शहा यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रेम जेंव्हा अशरीरी होते तेंव्हा ते अद्वैयानंदाला पोहोचते. त्याचा प्रवास लौकिकाकडून अलौकिकाकडे घेऊन जातो. कविवर्य कृ. ब. निकुंब यांची प्रेम कविता प्रगल्भ जीवन स्पंदनांची जाणीव वाचकाला करून देते आणि ती सार्वजनिन व सर्व स्पर्शीत्व होऊन प्रकटते, असे विचार डॉ. शुभदा शहा यांनी व्यक्त केले.
मंथन कल्चर ऍण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे कविवर्य कृ. ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंगळवार दि. 22 रोजी सायंकाळी डॉ. शुभदा शहा यांचे ‘कविवर्य कृ. ब. निकुंब साहित्य आणि आस्वाद’ या विषयावर मंथनच्या युटय़ुब चॅनेलवरून व्याख्यान झाले.
डॉ. शहा म्हणाल्या, कृ. ब. निकुंब यांच्या साहित्याचा वाचन आणि व्यासंगामुळे ज्ञानाचे अनेक पदर लाभलेली ही व्यक्ती होती, हे जाणवले. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1920 मध्ये धुळे येथे झाला. 7 बहिणींनंतर त्यांचा जन्म झाला. पुढे ते नाशिकला आले. 1920 दरम्यानच रवीकिरण मंडळ उदयाला आले होते. त्याचा काहीसा प्रभाव निकुंबांवर निश्चितच होता. भाव कविता हा त्यांचा आवडता प्रांत. परंतु त्यांनी खंडकाव्यही प्रसिद्ध केले आहे. सत्य कथेने त्यावर टिपण करताना ‘हे खंडकाव्य म्हणजे’ जीवन व्यापी चिंतन, प्राःकथेचे उपयोजन, अभिजाततेची पार्श्वभूमी आणि प्रौढ कलात्मक, विदग्ध भाषा यांचा समन्वय आहे, असे म्हटले होते, याची माहिती डॉ. शहा यांनी दिली.
मृगावर्त या काव्यखंडात त्यांनी भागवतातील पाचव्या स्कंधातील भरत कथा घेतली आहे. वाघ पाठी लागल्याने जीवाच्या आकांताने गर्भवती असलेली हरिणी धावताना भरत राजाच्या दृष्टीला पडली. पळताना तिचा गर्भपात होऊन हरिण शावक नदीत पडली. मात्र त्याचवेळी हरिणीने भरताकडे एक व्याकुळ नजर टाकली आणि ती पुढे निघाली. भरताने या शावकाला आणले व त्याचे संगोपन केले. परंतु भरताला व्याकुळ करून शेवटी ते हरिण निघून जाते. या एका काव्यातून अनेकत्वाकडून एकत्वाकडे जायचे, ही कवीची भूमिका आहे. प्रत्येकाच्या मनात एक मृग आहे, तो आवर्तात फिरतो आहे. मात्र त्याची आसक्ती, झपाटलेपण एकच आहे, असे कविला वाटते. त्यांनी या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. त्यावर जीवन भाष्य केल्याने त्याला सामाजिकता प्राप्त झाली. म्हणूनच हे काव्य विश्वात्मक पातळीवर पोहोचते, असे डॉ. शुभदा शहा म्हणाल्या.
जे जे सुंदर-मौल्यवान ते वाचकापर्यंत पोहोचविले
कवीचे बालपण खडतर होते. अनुभवाशिवाय उत्तम साहित्य निर्माण होत नाही. यावर त्यांचा विश्वास होता. मात्र परमनप्रवेश त्यांना उत्तम जमत होता. त्यामुळेच ते जेंव्हा बालकविता लिहितात तेंव्हा जीवनासक्ती, सौंदर्यसक्ती व्यक्त करतात. त्यांनी समीक्षा लिहिली त्याला वेगळेच वजन आहे. कारण कवी जेंव्हा समीक्षा करतो तेंव्हा जीवनाचे आकलन करून घेण्याची त्याची वृत्ती ही संवेदनशील आणि स्वागतशील असते. समीक्षा हे शास्त्र विधायक आणि विघातक आहे. परंतु निकुंबांनी त्यातील विधायकताच महत्त्वाची मानून जे जे सुंदर व मौल्यवान ते वाचकापर्यंत पोहोचविले, असे वक्त्यांनी नमूद केले.
‘प्रेम कविता’ हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ‘मला मी पण नसावे, तुला नसावे तू पण’ असे वाटत असले तरी चौकटीबाहेर पडायचे नाही या अट्टाहासापोटी ही प्रेम कविता वेगळे वळण घेते. ताटातूट नसली तरी वेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि समांतर रेषेने जावे लागते. प्रेम हे तर कवीचे बळ आहे. ते नसेल तर वाटचाल कठीण होते. पण निकुंबांची घडणच अशी आहे की वाचक सुद्धा त्याचा आस्वाद घेऊ शकतो. वास्तव स्वीकारताना जुन्या वाटा बुजवून समोर येणारी वाट उत्तम करण्याचा तो विचार करतो. अलिप्तपणे गतकाळाकडे पाहतो आणि स्मृतींच्या आधारावर पुढील आयुष्य जगताना
‘काही प्राप्त, काही लुप्त, काही फक्त क्षितिजाचे,
जे जे हाती ते ते आनंद घनाचे’
याच भावनेपर्यंत तो पोहोचतो. त्यामुळे त्याचा प्रवास द्वैताकडून अद्वैताकडे सुरू होतो, असे त्यांनी सांगितले.
या अद्वैयानंदात सर्व लोकांनी सहभागी व्हावे. केशरी फाल्गुनाचा आणि घुंगूर टिपरीचा आनंद घ्यावा. आकाशाच्या निळाईशी कवी एकरूप होतो. त्या निळाईचे तेज मनात उतरवताना सर्वांनीच त्याचा आनंद घ्यावा, अशा उदात पातळीपर्यंत कविता येवून पोहोचते. म्हणून तिला सर्व स्पर्शीत्व प्राप्त होते, असे सांगून शुभदा शहा यांनी समारोप केला.
प्रारंभी कवी कृ. ब. निकुंब यांच्या ‘घाल घाल पिंगा वाऱया’ या कवितेचे गायन पुणे येथे असणाऱया पूर्वा जठार यांनी केले. मंथनच्या अध्यक्षा शोभा लोकूर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आशा कुलकर्णी यांनी डॉ. शुभदा शहा यांचा परिचय करून दिला. लक्ष्मी तिगडी यांनी आभार मानले. संकेत कुलकर्णी आणि सिद्धांत याळगी यांनी तंत्रसाहाय्य केले.









