प्राथमिक मराठी शाळेच्या अमृत महोत्सव सोहळ्याला सुरुवात
आज मुख्य कार्यक्रम, नितीन सावंत यांचे विशेष व्याख्यानः दुपारी अजितकुमार कोष्टी यांचा हसवणूक कार्यक्रम
वार्ताहर / किणये
टाळ मृदंग व ढोल ताशाच्या गजरात नाम घेत गावात निघालेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. नावगे येथील प्राथमिक मराठी शाळेच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त शनिवारी सकाळी गावात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत शाळेच्या मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. यामुळे ग्रंथदिंडीच्या माध्यमातून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले.
शनिवारी सकाळी शाळेच्या आवारात ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी दिंडीत सहभागी आणि मिरवणुकीसाठी लागणाऱया ट्रक्टरचे पूजन सुजाता कर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सरस्वती मूर्तीचे पूजन एसडीएमसीच्या उपाध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानेश्वरी ग्रंथपूजन हभप बाबू मोटणकर यांनी केले. निवृत्त सुभेदार मोहन पाटील यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. पी. सुतार यांनी केले. सूत्रसंचालन आण्णाप्पा पाटील व विनायक पाटील यांनी केले.
याप्रसंगी एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष चांगाप्पा येळळूरकर, माजी अध्यक्ष सातेरी कामती, ग्रा. पं. सदस्य अपुणी पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
दिंडी चालक म्हणून हभप परशराम कणगुटकर महाराज सोनोली हे होते. त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि दिंडीचे महत्त्व यावेळी सांगितले.
दिंडीचे उद्घाटन झाल्यानंतर टाळ मृदंग व ढोल ताशांच्या गजरात दिंडी संपूर्ण गावभर निघाली. या ग्रंथदिंडीनिमित्त प्रत्येक गल्लीमध्ये आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दिंडीचे घरोघरी महिला आरती ओवाळून स्वागत करीत होत्या.
ग्रंथदिंडी संपूर्ण गावभर फिरल्यानंतर सायंकाळी गावातील रामलिंगेश्वर तीर्थावर येऊन ग्रंथदिंडीची आरती करून व पसायदानाने सांगता करण्यात आली.
शाळेच्या अमृतमहोत्सव सोहळ्याचा रविवार दि. 26 रोजी मुख्य दिवस असून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता अमृतमहोत्सव सोहळ्याया उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. प्रारंभी शाळेमध्ये ज्या शिक्षकांनी सेवा बजावलेली आहे अशा सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर परभणी येथील साहित्यिक, महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रवचन व कीर्तनकार, अध्यात्माचे गाढे अभ्यासक नितीन सावंत यांचे विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.
दुपारी दीड ते अडीच या वेळेमध्ये उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 2ः30 वाजता दुसऱया सत्राला प्रारंभ होणार आहे. या सत्रामध्ये सांगली येथील हास्यसम्राट फेम प्रा. अजित कुमार कोष्टी यांचा हसवणूक हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5ः30 वाजता शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे अमृत महोत्सव कमिटी, शाळा सुधारणा कमिटी व ग्रामस्थ यांच्यावतीने कळविण्यात आले आहे.









