मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या आणि मुलगा इंद्रजित साठे, सुना जावई, नातवंडे असा परिवार आहे.
स्नेहलता यांचे चपला हे पूर्वाश्रमीचे नाव, चपला आत्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या. सावरकर घराण्यातील आणि त्यांच्या विचारांचे प्रेरणादायी तसेच कृतिशील व्यक्तिमत्व गमावल्याने सावरकरप्रेमींवर एकच शोककळा पसरली आहे.
स्नेहलता साठे या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतणी आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष स्व. विक्रमराव सावरकर यांच्या भगिनी होत्या. मात्र, त्यांनी त्यांची ही ओळख कधीच कुणालाही दाखवली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारसा लाभलेल्या स्नेहलता साठे यांनी सावरकर विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले. 8 एप्रिल 1937 या दिवशी जन्म झालेल्या चपला यांचे बालपण वडील नारायण सावरकर, काका बाबाराव आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात गेले. या वारशाचा परिणाम त्यांच्यावर आयुष्यभर होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या त्या सक्रीय सदस्या होत्या तसेच स्मारकाच्या कार्यात अधिकाधिक लौकिक वाढावा तसेच कार्य राष्ट्रपातळीवर विस्तारीत व्हावे, यासाठी त्यांची तळमळ असायची. सावरकर घराण्यातील स्त्रियांचे कर्तृत्व समाजापुढे आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करत नंदादीप समितीची स्थापना केली. तसेच शुभंकरोती विवाह संस्थेची धुरा त्यांच्याकडे होती. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांचे वार्षिक मेळावे व दर आठवड्याला परिचय सत्रे असे उपक्रम त्यांनी राबवून अनेकांचे विवाह जुळवून आणत संसार उभे केले.









