वृत्तसंस्था/ रोम
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय क्लेकोर्ट इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी विजेत्या राफेल नदालचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचने एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनने राफेल नदालला 6-2, 7-5 अशा सरळ सेटस्मध्ये पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. नादालने यापूर्वी ही स्पर्धा नऊवेळा जिंकली होती. शुवार्त्झमनचा उपांत्य फेरीचा सामना कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हशी होणार आहे. शेपोव्हॅलोव्हने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचे आव्हान 6-2, 3-6, 6-2 असे संपुष्टात आणले. सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचने जर्मनीच्या बिगर मानांकित कोफेरचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले तर नॉर्वेच्या कास्पर रूडने इटलीच्या बेरेटेनीचा 4-6, 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला.









