प्रतिनिधी/ बेळगाव
सगळय़ांच्याच जीवनशैलीत बदल घडला आहे. त्याचा तुम्ही कसा स्वीकार करता आणि तो अंमलात आणता व समाजासाठी त्याचा कसा सदुपयोग करू शकता, हे महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असले तरी नाती, हास्य, मैत्री, मदत यांना लॉकडाऊन नाही हे लक्षात घ्या, असे आवाहन रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या अधिकारग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. व्यासपीठावर मावळते उपप्रांतपाल विरधवल उपाध्ये, नूतन उपप्रांतपाल अजय हेडा, नूतन सचिव सायगावी, नूतन अध्यक्ष डॉ. अल्पेश टोपराणी, सचिव सत्यम् स्वामी, नियोजित अध्यक्ष अशोक नाईक आदी उपस्थित होते.
अविनाश पोतदार म्हणाले, अनुभवाइतका गुरु कोणताच नाही. चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा अनुभव आपल्याला बरेच शिकवितो. एखादी गोष्ट घडण्याची वाट पाहू नका तर तुम्हीच ती करून आदर्श ठेवा. कोणत्याही संघटनेचे यश हे सांघिकतेवर असते. त्यामुळे संपूर्ण सदस्यांना समजून घ्या. आपली मुळे तोडू नका. सदस्यांना संधी द्या आणि प्राप्त परिस्थितीत जे करणे शक्मय आहे, ते समाजासाठी करा, असेही ते म्हणाले.
रोटे. रवी करलिंगण्णावर यांनी अध्यक्षांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. मावळते अध्यक्ष जयसिंह बेलगल यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. उदय जोशी यांनी स्वागत केले. त्यानंतर जयसिंह यांनी प्रास्ताविक करताना आपली कारकीर्द सर्वांच्या सहकार्यामुळे यशस्वी झाली. अनेकांचे सहकार्य लाभले, असे सांगून आपल्या कारकीर्दीत आपण काही विशेष पुरस्कार देत आहोत, असे स्पष्ट केले.
यावेळी बेस्ट रोटेरियन म्हणून अशोक नाईक, बेस्ट ऍन म्हणून रेखा नाशी, बेस्ट सर्व्हिस म्हणून सतीश कुलकर्णी, स्पेशल अवॉर्ड म्हणून प्रकाश बडकुंर्दी यांना गौरविण्यात आले. आपल्याला मदत केलेल्या मल्लय्यास्वामी हिरेमठ यांचा त्यांनी विशेष गौरव केला. विरधवल उपाध्ये यांनी क्लबला सहकार्य करण्याची ग्वाही देऊन शुभेच्छा दिल्या.
रोटे. अविनाश पोतदार यांचा परिचय आनंद भुकेबाग यांनी करून दिला. आनंद देशपांडे यांचा परिचय सतीश कुलकर्णी यांनी तर रमेश रामगुरवाडी यांनी नूतन सदस्य जिनेंद्र कुंदूर यांचा तर आनंद देशपांडे यांचा परिचय सतीश कुलकर्णी यांनी करून दिला. रोटे. रुद्रय्या सायगावी यांनी अहवाल वाचन केले. नूतन अध्यक्ष आणि सचिव यांचा परिचय विनय बेहेरे यांनी करून दिला.
रोटरीचा लौकिक वाढवू
यावेळी अधिकार स्वीकारून डॉ. अल्पेश टोपराणी म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर काही ठराविक क्षेत्रात आपण प्राधान्याने काम करणार आहोत. ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, विलगीकरण कक्षांची निर्मिती करणे, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात विशेष काम करणार आहे, असे सांगितले. रोटरी संधीचे दार खुले करते. प्रत्येक सदस्याकडे वेगवेगळे कौशल्य आहे. त्याचा उपयोग करून रोटरीचा लौकिक वाढवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उपप्रांतपाल अजय हेडा यांनी सदस्यत्व वाढवा आणि रोटरीसाठी निधी संकलन करा, असे आवाहन केले. नूतन अध्यक्ष अल्पेश टोपराणी यांनी सर्व कार्यकारिणीचा परिचय करून दिला. सचिव सत्यम् स्वामी यांनी पुढील उपक्रमांची रुपरेषा स्पष्ट केली. सूत्रसंचालन सतीश कुलकर्णी यांनी केले. रोटे. अशोक नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रम ऑनलाईन व झूम माध्यमातून यशस्वी करण्यासाठी नागराज नाशी यांनी विशेष परिश्रम घेतले.









