प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथे गावचे सुपुत्र कै. पै. नानासाहेब निकम यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत नागेवाडी गावचा सुपुत्र कुमार केसरी पै. सूरज निकम याने पै. राजेंद्र राजमानेला घुटना डावावर चितपट केले. मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, मंजुषा केतरी यांची उपस्थिती हे मैदानाचे खास आकर्षण ठरले. व्दितीय क्रमांकाच्या लढतीत पै. सिकंदर शेख याने दिल्लीच्या पै. पवनकुमार याला बॅक थ्रो डावावर आस्मान दाखविले. या मैदानात लहान मोठय़ा शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.
नागेवाडी गावचे सुपुत्र आणि जुन्या पिढीतील नामांकित मल्ल कै. नानासाहेब महादेव निकम यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पैलवानकी केली. त्यांना नाना पैलवान या नावाने ओळखले जात होते. 22 वर्षे त्यांनी सांगलीच्या सरकारी तालमीत राहून कुस्ती जोपासली होती. एक नामांकित आणि पहाडी मल्ल म्हणून त्यांचा राज्यभरात नावलौकीक होता. कै. नानासाहेब निकम यांचे कुस्तीवरील प्रेम जपण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ नागेवाडीत दरवर्षी भव्य कुस्ती मैदान आयोजित केले जाते. कुस्ती मैदानाचे हे तिसरे वर्ष होते.
मैदानाचे उद्घाटन प. पू. रमेश महाराज कदमवाडीकर, शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक प्रतापदादा साळुंखे, आमदार अनिल बाबर, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, उद्योजक ईश्वर जाधव, उमेश काटकर, सुखदेव पाटणकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, प्रा. बबन निकम, राजकुमार निकम, दर्शनकुमार निकम, बापूराव निकम यांच्या उपस्थितीत पार पडले.
या मैदानात नागेवाडी गावचा सुपुत्र पै. महादेव निकम याने चटकदार कुस्ती केली. यावेळी मैदानात पंच म्हणून रावसाहेब मगर, नजरूद्दीन नायकवडी, विजय पाटील, आलम तांबोळी, हणमंत तात्या निकम, भगत यादव, हणमंत शामराव निकम, हणमंत बाबर, काकासाहेब चव्हाण, विलास साळुंखे, सयाजी निकम यांनी काम पाहिले. मैदानाचे संयोजन प्रा. बबन निकम यांनी केले. कुस्त्यांचे समालोचन शंकर आण्णा पुजारी, सुरेश गवळी आणि जोतिराम वाजे यांनी केले.








