अतिवृष्टी काळात हनुमान मित्र मंडळाचा मदतीचा वर्षाव, हातकणंगले, शिरोळमधील पूरबाधितांना दिला आधार
धीरज बरगे/कोल्हापूर
मंडळाने ठरवले तर आभाळा एवढं कार्य कसे करता येते, याची प्रचिती जिल्हय़ात नुकत्याच येवून गेलेल्या महापूराच्या संकटात नागांव (ता. हातकणंगले) येथील हनुमान मित्र मंडळाने दिली. अतिवृष्टी काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नागांवपासून शिरोळ बंधाऱ्यापर्यंतच्या पूरबाधितांना मदतीचा हात दिला. जनावरांना चारा, महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना जेवण, जीवनावश्यक कीटचे वाटप अशी मदत पुरवत मुक्या जनावरांसह पूरग्रस्तांना लाखमोलाचा आधार दिला. महापूरामुळे संसार उद्धवस्त झालेल्या अनेक कुटुंबांना संजीवनी देण्याचे काम नागांवच्या हनुमान मित्र मंडळाने केले आहे.
जिल्हय़ात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराचा फटाक अनेक गावांना बसला. शिरोळ तालुक्यातील गावांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्ती काळात बेघर झालेली कुटुंबे, जनावरे यांना हनुमान मंडळाचा आधार मिळाला. चारा, जेवण, अन्नधान्य वाटप यामधून सुमारे चाळीस लाख रुपयांची मदत मंडळाने पुरवली आहे. यासोबतच मंडळाकडून गणेशोत्सव, शिवजयंती उत्सवासह वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
150 जनावरांसाठी उभारला गोठा
हालोंडी (ता. हातकणंगले) गावातील 150 जनावरांसाठी मंडळाने नागांवमध्ये गोठा उभारला. घरच्या जनावरांप्रमाणे या जनावरांची देखभाल कार्यकर्त्यांनी केली. पुशखाद्य, कडबकुट्टी, चारा या जनावरांना दिला. तसेच नागांव, पु. शिरोलीसह आसपासच्या गावांना दररोज चार ट्रॉली चार पुरविण्याचे काम मंडळाने केले.
महमार्गावरील 1 हजार प्रवाशांना जेवण
महापूरामुळे पुणे-बेंगळूर महामार्गावर अडकून पडलेल्या ट्रक चालकांसह अन्य प्रवाशांच्या पोटाला आधर देण्यात आला. महामार्ग सुरु होईपर्यंत दररोज 1 हजार प्रवाशांना जेवण पुरविण्यात आले.
1 हजार 400 पूरग्रस्तांना मदत
शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, राजापूर, घोसरवाड, दत्तवाड, घालवाड, हालोंडी गावातील ग्रामस्थांना महापूराने बेघर केले. अशा 1 हजार 400 पुरबाधित कुटुंबांना मंडळाने अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे किट पुरवत संकटकाळात मोलाची मदत केली.
गणेशोत्सव वर्गणीमधून दिली म्हैस
मंडळामधील एका कार्यकर्त्याचा गोठा अचानक जळून त्याचे मोठे नुकसान झाले. या कार्यकर्त्याला धीर देण्यासाठी मंडळाने गणेशोत्सवाच्या वर्गणीमधून त्याला एक म्हैस घेवून देत आर्थिक आधार दिला.
अकरा गडकिल्ल्यांची सफाई
कार्यकर्त्यांनी गडकिल्लंची सफाई मोहीमही हाती घेतली आहे. आत्तापर्यंत मंडळाने विशाळगड, पन्हाळा, वसंतगड, भुदरगड, रांगणा, रायगड महदरवाजा अशा 11 गडकिल्ल्यांवर सफाई मोहीम राबवली आहे.
मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम
महापूरातील मदतीसह मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिवजयंतीला रक्तदान शिबिर, चार होतकरु विद्यर्थ्यांचा शैक्षणिक खर्च मडंळाकडून केला जातो. गावात झालेल्या एका मोठय़ा चोरीमधील चोर मुद्देमालासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिले होते. यामुळे मंडळाला पोलीस मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
– अभिनंदन सोळांकुरे, हनुमान मित्र मंडळ, नागांव.