प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱया सर्व नागरी पतपुरवठा संस्थांना त्यांचे कार्य दिवसाआड सुरू करण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी गुरूवार दि. 2 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका व्यापक बैठकीत त्वरित निर्णय घेण्यात आला. गेले 8 दिवस राज्यातील क्रेडीट व नागरी पतपुरवठा संस्था बंद आहेत. सरकारने मंगळवारी याबाबत जनतेला भेडसावत असलेल्या समस्यांचा विचार करून या सोसायटय़ा जनतेसाठी खुल्या ठेवण्याचा मार्ग मोकळा केला. मात्र नियंत्रित वेळेमध्येच या संस्थांचे नियंत्रित व्यापार चालू राहील. त्यासाठी काही विशिष्टे बंधनेदेखील घालण्यात येतील. याव्यतिरिक्त सोसायटय़ांना दिवसाआड एकदा कार्यालये खुली ठेवण्यात परवानगी देण्यात येईल. एखाद्या सोसायटीच्या अनेक शाखा असतील तर त्यातील 50 टक्के शाखा आज आणि 50 टक्के शाखा उद्या उघडण्यात याव्यात अशी तरतूद करण्यात येणार आहे.









