दहा हजारांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
प्रतिनिधी/ वास्को
नागरिकत्व दुरूस्ती कायदय़ाच्या समर्थनार्थ काल रविवारी वास्कोत काढण्यात आलेली भव्य मिरवणूक विक्रमी होऊन ऐतिहासिक ठरली. दहा हजारांहून अधिक नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले. मिरवणुकीत हिंदुत्वाचा स्फुल्लिंग चेतवला गेला. भगवे झेंडे आणि ढोलताशांमुळे मिरवणूक जल्लोषपूर्ण झाली. जय शिवाजी जय भवानी आणि भारत माता की जयच्या घोषणा जवळपास दोन तास निनादल्या. ही मिरवणूक वास्कोत ऐतिहासिक ठरली.
नागरिकत्व दुरूस्ती कायदय़ाच्या विरोधात वास्को शहरात काही निदर्नशने व मिरवणुका झाल्याने मागच्या पंधरा दिवसांपासून ‘मुरगाव सपोर्ट सीएए’ या शिर्षकाखाली सीएएच्या समर्थनार्थ भव्य मिरवणूक काढण्यासाठी काही राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकांनी हालचाली सुरू केल्या होत्या. माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. वास्को परिसर आणि मुरगाव तालुक्यातील इतर काही भागात या मिरवणुकीसाठी जनजागृती करण्यात आली होती.
वास्कोत मिरवणूक ठरली विक्रमी, ऐतिहासिक
अंदाजे दहा हजार लोकांचा सहभाग या मिरवणुकीत असेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला होता. तो खरा ठरला. आयोजकांनी या मिरवणुकीत सर्वधर्मीय लोक सहभागी होतील असाही विश्वास व्यक्त केला होता. या मिरवणुकीने हळुहळु भगवे वळण घेतले. अल्पसंख्याक समाजाचा सहभाग क्वचितच दिसून आला. ख्रिश्चन लोकही सहभागी झालेल होते. मात्र, मिरवणूक प्रचंड यशस्वी ठरली, एवढेच नव्हे तर ती ऐतिहासिक ठरली.
राष्ट्रवादाचा चैतन्यदायी आविष्कार
मिरवणुकीत प्रत्येकाच्या हाती राष्ट्रध्वज तिरंगा, भगवा झेंडा व सीएएचे समर्थन करणारे फलक होते. संपूर्ण वास्को शहरात या मिरवणुकीने राष्ट्रवादी वातावरण निर्माण केले. मिरवणुकीत बऱयाच कार्यकर्त्यांनी भगवा पेहरावही केला होता. ढोलताशे आणि देशभक्तीचे स्वरही मिरवणुकीत गरजले. जय शिवाजी जय भवानी, भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा दोन तास गुंजल्या. या सर्व वातावरणामुळे एकप्रकारे राष्ट्रवादाचा चैतन्यदायी आविष्कार घडून आला.
अनेक संस्था, संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
या मिरवणुकीने काही वेळ शिमगोत्सव चित्ररथ मिरवणुकीची आठवण करून दिली. या मिरवणुकीत विविध देवस्थानच्या समित्या व हिंदु संस्था, संघटनांचाही सहभाग होता. त्यामुळेच मिरवणुकीत हिदुत्वमय माहोल तयार झाला. मिरवणुकीने हिंदु लोकांच्या सहभागाची विक्रमी नोंद केली. महिलांचाही सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. उत्तर भारतीय नागरिकांनीही या मिरवणुकीत आपला सहभाग मोठय़ा प्रमाणात अधोरेखित केला. सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचाही या मिरवणुकीत सहभाग दिसून आला. विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनी, मुरगाव हिंदु एकता, मिशन मोदी पीएम अगेन, ज्येष्ठ सैनिक कल्याण संघटना अशा व इतर संघटनांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी वास्कोतील सीएए समर्थनातील मिरवणुकीत दहा हजार नागरिक सहभागी झाल्याचा असा दावा केला आहे. त्यात सर्वधर्मिय आणि सर्व राजकीय पक्षातील लोक होते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दहा हजारांहून अधिक राष्ट्रवादींचा हुंकार
मिरवणुकीला संध्याकाळी चारच्या सुमारास कदंब बसस्थानकाजवळून सुरूवात झाली. एकाच ठिकाणावर हजारो नागरिकांना सामावून घेणे शक्य नसल्याचे दिसताच सडा बोगदा भागातून आलेल्या हजारो लोकांना शहरातील स्वातंत्र्य पथमार्गावरच थांबविण्यात आले. मिरवणूक स्वातंत्र्यपथावरून साडेपाचच्या सुमारास जोशी चौक व मुरगाव पालिका इमारतीसमोर आली. दहा हजारांहून अधिक मोठा जनसमुदाय नागरिकत्व दुरूस्ती कायदय़ाच्या समर्थनार्थ या ठिकाणी जमा झाला. मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री मिलिंद नाईक, माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर, निवृत्त सैनिक सुरजीत शर्मा यांनी मिरवणुकीची सांगता करण्यापूर्वी जनतेला सीएएसंबंधी संबोधित केले. आमदार कार्लुस आल्मेदा, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेवक, सरपंच व पंच, राष्ट्रीय हुदु युवा वाहिनीचे अविनाश तिवारी अशा इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती. व्यवस्थेसाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस फौजफाटा होता. त्यामुळे मिरवणूक कोणत्याही गोंधळाविना सुरळीत पार पडली.
काँग्रेसने देशात हिंसाचार माजविला : मंत्री माविन गुदिन्हो
मिरवणुकीच्या सांगता सभेत बोलताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी जे लोक सीसीएसंबंधी जनतेची दिशाभूल करीत आहेत त्यांच्यासाठी ही भव्य मिरवणूक हे योग्य उत्तर असल्याचे स्पष्ट केले. या प्रश्नावर काँग्रेसने लोकांना भडकावून देशात हिंसाचार माजवला आहे. नागरिकत्व कायदा दुरूस्त करून भाजपा सरकारने शेजारील देशातील अल्पसंख्याक लोक, ज्यांच्यावर आतापर्यंत अत्याचार होत आला आहे त्यांना न्याय दिलेला आहे. जे काँग्रेसला साठ वर्षात शक्य झाले नव्हते ते भाजपा सरकारने करून दाखवलेले आहे. या कायदय़ाच्या समर्थनार्थ आज लोक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आलेले आहेत. देशाच्या संरक्षणासाठी ते आलेले आहेत. त्यामुळे एक चांगला संदेश आज देशभर पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक जागतिक नेते असून जनतेचा त्यांच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे, असे मंत्री गुदिन्हो यावेळी म्हणाले.
सीएएला 90 टक्के लोकांचा पाठिंबा : मंत्री मिलिंद नाईक
मंत्री मिलिंद नाईक म्हणाले की सीएए हा कायदा भाजपाचा नव्हे तर देशाचा आहे. आज मिरवणुकीत सहभागी झालेले लोक देशहिताचा विचार करून आलेले आहेत. म्हणूनच वास्कोतील ही मिरवणूक विक्रमी आणि ऐतिहासिक मिरवणूक ठरलेली आहे. केंद्र सरकार आपला जाहीरनामा पूर्ण करण्याकडे वाटचाल करीत आहे. तीन तलाक, कलम 370, राम मंदिर असे प्रश्न सरकारने सोडवलेले आहेत. सीसीए हासुध्दा एक जुना प्रश्न असून 10 टक्के लोकांचा त्याला विरोध असला तरी 90 टक्के लोकांचा या कायदय़ाला पाठिंबा आहे हे लक्षात घ्यायला हवे असे मंत्री मिलिंद नाईक म्हणाले.
सीएएमुळे कुणाचे नुकसान झाल्याचे दाखवा : राजेंद्र आर्लेकर
माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी यावेळी बोलताना सीएएला विरोध आणि जनतेची दिशाभूल आता कुणी सहन करणार नाही असाच संदेश या मिरवणुकीने दिल्याचे सांगितले. यापूर्वी वास्कोत या कायदय़ाला विरोध करण्यासाठी लोकांना आणले गेले. मात्र, त्यांना आपण कोणाला व का विरोध करतो हेच माहित नव्हते. शेजारी देशांनी अल्पसंख्याकांची सुरक्षा जपलेली नाही. म्हणूनच हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. असे स्पष्ट करून या कायदय़ामुळे कुणावर अन्याय झालेला असल्यास ते दाखवून द्यावे असे आव्हान आर्लेकर यांनी विरोधकांना दिले.
जयंत जाधव व किरण नाईक यांनी सुत्रसंचालन केले तर प्रशांत नार्वेकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने या मिरवणुकीची सांगता झाली.









