ऑनलाईन टीम / नागपूर :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपुरात कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. या अंतर्गत आज आणि उद्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार यामध्ये सर्व बाजारपेठ आणि दुकाने बंद असणार आहेत. नागपुरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरमध्ये सुरू झालेल्या मिनी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आदेशाची कडक अंमलबजावणी होत आहे. नागपूर शहरातील सर्व रस्ते, गर्दी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांमध्ये चिटपाखरू देखील दिसत नव्हते.
दरम्यान, रुग्ण संख्या वाढू नये यासाठी सोमवारपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था बंद ठेवल्या जाणार आहेत. त्याशिवाय नागपुरातील ग्रंथालयं, स्वीमिंग पुलंही बंद राहणार आहेत. तसेच, आजपासून मंगल कार्यालये, लॅानमधील लग्न समारंभाला प्रतिबंध घालण्यात आला आहे.
यासोबतच महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज आणि उद्या आवश्यकतेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे आवाहन ही केले आहे. या आवाहनास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.








