आमदार रवी नाईक यांनी व्यक्त केली चिंता
प्रतिनिधी / फोंडा
फोंडयात राष्ट्रीय महामार्गासाठी करोडो रूपये खर्चुन चौपदारी उड्डाडापूल बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र फोंडयात ग्रामिण भागातून थेट शहरात जोडण्यासाठी असलेल्या पुलाची परिस्थिती बिकट बनली आहे. नागझरी कुर्टी येथील पुल कमकुवत बनल्याचे चित्र दिसत आहे. सदर पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्यामुळे आमदार रवी नाईक यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नागझर-कुर्टी येथील महादेव मंदाराजवळील पुलाच्या सळई दिसत असून सिमेंट सुटून पुल कमकुवत बनलेला आहे. 40 वर्षापुर्वी पुलाची बांधणी झाली होती. त्या पुलावरून अवजड वाहनांची ये-जा होत असते त्यामुळे तो वाहतूकीसाठी कितपत सुखरूप आहे असा सवाल आमदार नाईक यांनी उपस्थित केला आहे. जीर्ण झालेल्या पुलांचे पावसाळय़ापुर्वी बांधकाम खात्याने सर्वेक्षण करावे, पुलाची वाहतूक क्षमता तपासून पाहावी, तसेच डागडूजी किंवा समांतर पुलाची व्यवस्था करण्यात यावी. सदर पुल कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रात असून पंचायतीनेही वेळोवेळी याप्रकरणी पत्रव्यवहार बांधकाम खात्य़ाकडे करावा अशी सुचना केली आहे. महामार्गाच्या सर्व्हीस रोडच्या निविदेत किंवा बांधकाम खात्याने याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.









