वृत्त संस्था / नवी दिल्ली
आगामी आयपीएल क्रिकेट हंगामासाठी नव्या संघांच्या टेंडर डॉक्यूमेंट खरेदी करण्यासाठी बीसीसीआयने दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे आता याच स्पर्धेतील नव्या संघांसाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदत असेल. आगामी आयपीएल स्पर्धेत दोन नव्या संघांचा समावेश असेल. या नव्या संघांसाठी फ्रांच्यायजीना किमान 3500 कोटी किंमत राहील, अशी शक्यता आहे.
आयपीएल नियंत्रण मंडळाने नव्या इच्छुक संघांसाठी अत्यावश्यक कागदपत्रांसह टेंडर मागविले होते. टेंडर दाखल करण्यासाठी यापूर्वी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. टेंडर भरणाऱया इच्छुकांना परत न मिळण्याच्या अटीवर 10 लाख रूपये टेंडरची फी म्हणून भरणे जरूरीचे आहे. 2022 आयपीएल क्रिकेट स्पधेंत बीसीसीआयने आणखी दोन नव्या संघांचा समावेश करण्याची योजना आखली आहे. अहमदाबाद, लखनौ किंवा पुणे येथील हे दोन नवे संघ राहतील. भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठे उद्योगसमुह आयपीएलमध्ये दाखल होण्यास इच्छुक आहेत. कोटक ग्रुप, ऑरोबिंदू फार्मा, टोरेंट फार्मा, आरपी संजीव गोयंका ग्रुप, बिर्ला ग्रुप, अदानी ग्रुप यांचा समावेश आहे.









