काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा आरोप : मक्तेदारी निर्माण होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी नव्या कृषी कायद्यांसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. मूठभर लोकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा होत आहे. हे लोक पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत. देशातील 60 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. परंतु शेतीवरही एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. देशाचे कृषिक्षेत्र उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानेच हे कायदे तयार करण्यात आल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. अरुणाचल प्रदेशात चीनने गाव वसविल्याच्या मुद्दय़ावर बोलताना राहुल यांनी स्पष्ट संदेश न दिल्यास चीन याचा लाभ उचलणार असल्याचे म्हटले आहे.
पूर्ण देश विरोधात गेला तरीही मी सत्यासाठी लढत राहणार आहे. मोदी किंवा भाजपला मी घाबरत नाही. कृषिक्षेत्राचा लाभ आतापर्यंत शेतकरी आणि मजुरांना व्हायचा. एक व्यवस्था होती, ज्यात बाजारपेठ, आवश्यक वस्तू अधिनियम आणि अन्य कायदे सामील होते. नव्या कृषी कायद्यांमुळे 4-5 लोकांच्या हातात पूर्ण कृषिव्यवस्था जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कृषी कायद्यांवर राहुल यांनी ‘खेती का खून तीन काले कानून’ नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे.
निवडकांची मक्तेदारी
प्रत्येक क्षेत्रात 4-5 लोकांचा एकाधिकार वाढतोय, याचा अर्थ या देशाचे 4-5 नवे मालक आहेत. आजवर शेतीत एकाधिकार झाला नव्हता. मोदी चार-पाच लोकांच्या हातात शेतीची पूर्ण व्यवस्था देत आहेत. ऊर्जा, बंदर, विमानतळक्षेत्रात केवळ काही जणांची मक्तेदारी निर्माण झाल्याचे राहुल म्हणाले.
तरुणाईच्या भविष्याचा प्रश्न
देशासमोर संकटाची स्थिती आहे. केंद्र सरकार देशाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चुकीची माहिती देत आहे. ही स्थिती बदलणे तरुणाईसाठी महत्त्वाचे आहे, हे वर्तमानाविषयी नसून भविष्याविषयी असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशात चीनने एक गाव वसविल्याच्या आरोपावरूनही काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. देशाच्या सार्वभौमत्वाप्रकरणी मोदी सरकार तडजोड करत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांनी ‘56 इंचाची छाती कुठे गेली’ अशी उपरोधिक टिप्पणी केली आहे.









